Khasdar Sanskrutik Mahotsav : ‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ महानाट्याचे दमदार सादरीकरण

07 Dec 2022 20:24:33
- स्‍थानिक गायकांचा सांगीतिक 'आविष्‍कार'

punyashlok ahilya mahanatya 

नागपूर :
‘इतिहासाने पानोपानी, जिची गाथा!, होळकरांची तेजस्वी ती, पुण्यश्लोक माता!’ अशा या राणी अहिल्याबाई होळकर यांच्‍या चरित्रावर आधारित ‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ या महानाट्याचे स्‍थानिक कलाकारांच्‍यावतीने दमदार सादरीकरण करण्‍यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या मध्‍य भारतातील सर्वात मोठ्या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाच्‍या सहाव्‍या दिवशी तापसी फाउंडेशन प्रस्‍तुत मराठा साम्राज्‍यातील सुप्रसिद्ध राणी, दानशूर, कर्तृत्‍ववान, धर्मपरायण राज्‍यकर्ती अहिल्‍याबाई होळकर यांच्‍या जीवनचरित्रावर आधारित ‘पुण्‍यश्‍लोक अहिल्‍या’ या हिंदी महानाट्याचा प्रयोग आयोजित करण्‍यात आला होता. अहिल्‍याबाई होळकर यांच्‍यावरील हे पहिले महानाट्य असून यात सुमारे दीडशे स्‍थानिक कलाकारांचा समावेश होता.
 
अत्यंत प्रेमाने सामान्य माणसाचे हित बघत, प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जागता यावे, इकडे लक्ष देणाऱ्या धार्मिक वृत्तीच्या राज्यशासक, कर्तृत्ववान, तडफदार व अलौकिक अशा लोकमाता, पुण्यश्लोक, अहिल्याबाई होळकर यांचे बालपण, होळकराकडे झालेला विवाह व त्यांनंतर उद्भवलेल्या अनेक कठीण प्रसंगातून तिचा खंबीरपणा, चातुर्य व त्याद्वारे अनेक संकटांवर कशी मात केली, अचूक न्यायदान करून पिडीत, शोषितांना न्‍याय मिळवून दिला. त्‍यांचा या संघर्षमय प्रवास नृत्य, गीत, संगीत व नाट्याच्या माध्‍यमातून दाखविण्‍यात आला.
 
राणी अहिल्‍याबाईंच्‍या मुख्‍य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री पूजा रायबागी - दाबके होत्या तर नाटकाचे लेखक व निर्मिती गौरव खोंड यांनी केली होती. दिग्‍दर्शक पियूष धुमकेकर होते तर संगीत दिग्‍दर्शन मुकूल काशिकर व नृत्‍य दिग्‍दर्शन श्रीकांत धबडगावकर यांचे होते. नेपथ्‍य समर बोबडे व दीक्षा ढोमणे, सूत्रधार दर्शन वाघमारे, अनिकेत कांबळे, धनंजय बोरीकर, सायली ठोंबरे, मुक्‍ता गोरे, प्रकाश योजना ऋषभ धापोडकर, रंगभूषा लालजी श्रीवास, वेशभूषा अतुल शेबे यांची होती.

punyashlok ahilya mahanatya 
 
आजच्‍या कार्यक्रमाला माजी खा. पद्मश्री डॉ. विकास महात्‍मे, विभागीय आयुक्‍त विजयलक्ष्‍मी बिदरी, सहपोलिस आयुक्‍त अस्‍वथी दोरजे, एअर व्‍हाईल मार्शल रेणुका कुंटे, माजी महापौर कुंदा विजयकर, निवृत्त न्‍या. मीरा खडक्‍कार, उर्मिला अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ती मीरा कडबे, माजी महापौर अर्चना डेहनकर, डॉ. मनिषा शेंबेकर, भाजपा महिला आघाडी अध्‍यक्ष नीता ठाकरे यांच्‍यासह आ. नागो गाणार, दक्षिण मध्‍य क्षेत्र सांस्‍कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांची उपस्‍थ‍िती होती.
  
प्रास्‍ताविकातून प्रा. अनिल सोले यांनी गुरुवारचे कार्यक्रम एक तासाने उशीराने सुरू होतील, अशी माहिती दिली. रात्री 7.30 वाजता छत्‍तीसगढी पंथी नृत्‍याचा कार्यक्रम तर रात्री 8.00 वाजता लेखक मनोज मुंतशिर यांचा ‘माँ, माटी और मोहब्‍बत’ हा कार्यक्रम सादर होईल. तेव्‍हा रसिकांची या बदललेल्‍या वेळांची दखल घ्‍यावी, असे आवाहन प्रा. अनिल सोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
 
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, सारंग गडकरी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, ॲड. नितीन तेलगोटे, विलास त्रिवेदी, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, मनीषा काशिकर यांचे सहकार्य लाभत आहे.
 
 
शशांक व इतर गायकांचा सांगीतिक ‘आविष्‍कार’
बोलताना अडखळत असतानाही अतिशय सुरेल गाणी सादर करण्‍याची दैवी देणगी लाभलेल्‍या नागपूर आयडॉल फेम शशांक जैन या युवा गायकाने रसिकांना रिझवले. त्‍याने ‘माई तेरी चुनरिया लहराई’ हे एकल व ‘एक मै और एक तू’ हे युगल गीत सादर करून मजा आणली. एवढ्या मोठ्या मंचावर कला सादर करण्‍याची संधी दिल्‍याबद्दल त्‍याने नितीन गडकरी यांचे व आयोजन समितीचे आभार मानले. शशांक जैनचा प्रा. राजेश बागडी यांनी सत्‍कार केला. तत्‍पूर्वी, आविष्‍कार कला अकादमीच्‍यावतीने ‘जागर राष्‍ट्रभक्‍तीचा’ हा देशभक्‍तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्‍यात आला. अमर कुळकर्णी यांच्‍या संयोजनात झालेल्‍या या कार्यक्रमाचे निवेदन मनोज साल्‍पेकर यांनी केले.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0