पी टी उषा यांची सार्थ निवड

05 Dec 2022 06:26:53

Runner PT Usha
 (Image Source : Twitter)
 
भारताची सुवर्ण कन्या, महान धावपटू पी टी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पी टी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही ऐतिहासिक घटना आहे. कारण आजवर या महत्वाच्या पदावर कोणत्याही खेळाडूची नियुक्ती झालेली नव्हती. हे पद जे कधीही मैदानात न उतरलेल्या, ज्यांचा खेळाशी कधीही संबंध न आलेल्या राजकीय व्यक्तींसाठीच आरक्षित होते. आज पी टी उषा यांची या पदावर निवड झाल्याने खऱ्या अर्थाने या पदाची आणि खेळाडूंची शान वाढली आहे. पी टी उषा या पदासाठी अतिशय योग्य व्यक्ती असून त्या आपली निवड सार्थ ठरवतील यात शंका नाही.
 
पी टी उषा या भारताच्याच नाही तर जगातल्या सर्वोत्कृष्ट धावपटू आहेत. भारताच्या तर त्या सर्वकालीन महान धावपटू आहेत. १९८० चे दशक तर त्यांनी अक्षरशः गाजवून सोडले होते. या दशकात त्यांनी भारतातच नव्हे तर जगात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. आशिआई स्पर्धा असोत की राष्ट्रकुल स्पर्धा, जागतिक मैदानी स्पर्धा असो की ऑलिम्पिक स्पर्धा पी टी उषा भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणार ही जणू काळ्या दगडाची रेघ होती. केवळ नशिबाने पी टी उषा यांना ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नसले, तरी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू होत्या. आपल्या कारकिर्दीत अनेक मान सन्मान मिळवणाऱ्या पी टी उषा यांची एक खेळाडू ते ऑलिम्पिक संघटने पर्यंतचा प्रवास युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.
 
२७ जून १९६४ साली केरळमधील कुथाळी या गावात अतिशय गरीब कुटुंबात झाला. पी टी उषा यांचे पूर्ण नाव पिल्लावुलपी थेक्कापारमबील उषा असे आहे. पी टी उषा यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाल्याने त्यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. घरची परिस्थिती गरिबीची असूनही त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून महिलांच्या क्रीडा महाविद्यालयात प्रवेश घेतला. लहानपणापासून खेळाची आवड असलेल्या पी टी उषा यांनी महाविद्यालयात आपल्या खेळाची चमक दाखवली. तिचा खेळ पाहून क्रीडा प्रशिक्षक ओ एम नांबियार यांनी तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिला धावण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळाले. राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून अनेक राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर करून तिने भारताच्या ऑलिम्पिक संघात स्थान मिळवले.
 
१९८० च्या ऑलिम्पिकमध्ये तिने प्रथम भारताचे प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रॅकसूट घालून धावणारी ती भारताची पाहिली महिला धावपटू ठरली. १९८२ साली दिल्लीत झालेल्या आशिआई स्पर्धेत तिने १०० व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले, तर १९८३ मध्ये कतार येथे झालेल्या आशिआई ट्रॅक ॲण्ड फिल्ड चॅम्पियन्स स्पर्धेत तिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले तो विक्रम १९८९ पर्यंत अबाधित होता. पी टी उषा यांनी एटीएफमध्ये जवळपास १३ सुवर्णपदके जिंकली आहेत. हा ही एक विक्रमच आहे. १९८४ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अडथळ्यांच्या शर्यतीत तिचे पदक काही शतांश सेकंदानी हुकले.
 
१९८६ साली सोल येथे झालेल्या दहाव्या आशिआई स्पर्धेत तिने ४ सुवर्ण व १ रौप्यपदक जिंकले. तिने आपल्या कारकिर्दीत १०० हुन अधिक पदके जिंकली आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी उषा स्कुल ऑफ एथलॅटिकसची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी हजारो होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण दिले. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावरही त्यांनी आपल्या नावाची मोहर उमटवली. पी टी उषा यांनी आपले संपूर्ण जीवन एथलॅटिकला समर्पित केले. आज त्यांच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने चीज झाले असे म्हणावे लागेल. आता त्या या पदाला न्याय देतील आणि आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत देशासाठी पदक मिळवणारे खेळाडू तयार करतील यात शंका नाही. पी टी उषा यांचे मनापासून अभिनंदन!
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.
 
Powered By Sangraha 9.0