(Image Source : Internet/ Representative image)
रांची:
एकीकडे दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या खळबळजनक घटनेने देशभरातील लोक अजूनही सावलेले नाहीत. दरम्यान झारखंडमधील साहिबगंजमध्ये अशाच प्रकारची घटना घडल्याने पुन्हा एकदा सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील बोरिओ येथे एका २२ वर्षीय आदिवासी महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे कटरने १२ तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे प्रकरण समोर आले आहे. हत्या करणारा दुसरा कोणी नसून तिचा पती दिलदार अन्सारी असल्याचे सांगितले जात आहे.
बोरिओ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोदा पहाड येथील रूबिका पहारिया हिचा खून केल्याच्या आरोपावरून दिलदार बरोबर त्याच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली. बोरिओ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री संथाली मोमीन टोला येथील कच्चा घरातून महिलेचा मृतदेह १२ हून अधिक तुकड्यांमध्ये सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, रुबिका पहारिया ही दिलदार अन्सारीची दुसरी पत्नी होती. गेल्या २ वर्षांपेक्षा अधिक काळातून दोघे एकमेकांना ओळखत होते. रूबिका गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. शनिवारी संध्याकाळी मोमीन टोला येथील लोकांना अंगणवाडी इमारतीच्या मागे कुत्र्यांचा कळप दिसला. हे कुत्रे मांसाचे तुकडे चिरडत होते. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. नंतर तपासणी केल्यानंतर हे मासाचे तुकडे मानवी शरीराचे (पायाचे) असल्याचे आढळले. तपास करत पोलिस एका बंद घरापर्यंत पोहोचली असता एका महिलेचा विकृत मृतदेह पडलेले आढळला.
महिलेच्या मृतदेहाचे १२ हून अधिक तुकडे मिळाल्यानंतर, तिची हत्या करून मृतदेहाचे इलेक्ट्रिक कटरसारख्या धारदार शस्त्राने कापले गेल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी रात्री पती दिलदारला अटक केली असून या संपूर्ण प्रकरणाबाबत त्याची चौकशी केली जात आहे. दिलदारच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिलदारचे मामा मोहम्मद याला देखील अटक केली आहे. दिलदारचे काका मोईनुल अन्सारीच्या घरातून हत्येत वापरलेली दोन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मोईनुल अन्सारी स्वतः घटनास्थळावरून पळून गेला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.