मुहूर्त ठरला! विश्वविख्यात आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा ४ फेब्रुवारीला

    17-Dec-2022
Total Views |

anganewadi bharadi devi jatra
(Image Source : Instagram)
 
 
अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. या जिल्ह्यातील मालवण तालुक्यापासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या मसुरे गावात आंगणेवाडी (Anganewadi) हे विश्वविख्यात ठिकाण आहे. दरवर्षी अगदी थाटामाटात येथे 'श्री भराडी देवीचा' वार्षिकोत्सव साजरा केला जातो. याठिकाणी मोठी जत्रा भरते, ज्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक देवीला साकड घालायला येतात. विशेष म्हणजे, यात्रेची तारीख ही एका विशिष्ट पद्धतीने काढली जाते. यंदाचा वार्षिकोत्सव ४ फेब्रुवारी २०२३ रोजी हर्षोल्हासात साजरा केला जाणर आहे.
जाणून घेऊया या उत्सवाबद्दल
 
भराडी देवीचा इतिहास -
नवसाला पावणारी श्री भराडी देवी ही सुमारे ३०० वर्षांपासून आंगणेवाडीच्या या वाड्यात विराजमान असल्याचे म्हटले जाते. ही देवी आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबीयांची असल्याचे सांगितले जाते. उजाड नापीक जागा जिथे झाडे, झुडपे, मनुष्य, प्राणी, वस्ती नसते तिला 'माळरान' असे म्हटले जाते. देवीचा आजूबाजूचा परिसर हा माळरान स्वरूपाचा असून, ही देवी भराडावर प्रकट झाल्यामुळे देवीचे नाव भराडी देवी असे पडले. या देवीच्या जत्रेची तारीख कोणत्या तिथी- तारखेनुसार नाही तर एका वेगळ्या पद्धतीने ठरविली जाते.
अशी आहे तारीख ठरवण्याची पद्धत -
भराडी देवीच्या उत्सवांची तारीख ठरलेली असली तरी उत्सव कधी आणि कोणत्या दिवशी साजरा होणार हे स्वतः भराडी देवीच सांगते. देव दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप करण्यात येते. तिसऱ्या दिवशी अंगाने परिवारातील मानकरी देवळात गोळा होतात व दरवर्षी नेमाने चार नवीन मानकरांची नेमणूक केली जाते. त्यानंतर हे मानकरी तांदूळ लावून देवीला 'कौल' लावतात. 'शिकारेस संपूर्ण गाव जमतो शिकार करूक तू हुकूम दे'' असे गाऱ्हाणे घालून कौल लावल्या जाते. पाषाणाला कौल लावून कौल मिळण्याची वाट पाहिली जाते. हा कौल मिळायला कधी-कधी ४ ते ५ दिवस देखील लागतात.
कौल मिळताच संपूर्ण गाव शिकारीला बाहेर पडत. शिकार करताना ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागतो, शिकार मिळेपर्यंत गावकरी घरी परतत नाहीत. शिकार वराहाची करावी लागते. एकदा का शिकार मिळाला की, गावकरी वाजत गाजत मंदिराजवळ येतात. ज्यांच्या गोळीने शिकार करण्यात आला, त्यांना मानाचा वीडा दिला जातो. मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. या ठिकाणी वराहचे मांस वेगळे केले जाते आणि त्यांचा (कोष्टी) प्रसाद म्हणून सगळ्यांमध्ये वाटप केला जातो.
वराहाचीच शिकार का केली जाते?
आंगणेवाडीची ही भराडी देवी सात्विक आहे. तिला मांस- मद्य पूर्ण वर्ज्य आहे. आंगणे लोक दारू पीत नाहीत. पण 'पंचक्रोशीतील असुरी शक्तींना शांत करा अन् मग माझा उत्सव आनंदाने साजरा करा' असे केल्याने गावावर आणि गावातील इतर व्यक्तींवरील संकट दूर होतील, असे देवीचे सांगणे आहे. तेव्हा दारू प्राशन केली जाते. हा कार्यक्रम संपल्यानंतर देवीकडून जत्रेची तारीख मागण्याचा दुसरा टप्प्याला सुरुवात होते.
 
शिकार साधल्याच्या तिसऱ्या दिवशी गावकरी पुन्हा देवळात गोळा होतात. काही धार्मिक विधी केल्या जाते. देवीपुढे पंचांग ठेऊन तारीख ठरवून देवीचा कौल मागितला जातो. देवीने कौल देताच जत्रेची तारीख ठरताच याची माहिती महाराष्ट्रातच नव्हे, तर अनेक राज्यात पसरवली जाते.
आंगणेवाडीची ही जत्रा दोन दिवसांची असते. दुसरा दिवस जत्रेचा असतो. सूर्योदयाच्यावेळीचा कवडसा देवीच्या मुखावर पडल्यानंतर देवीची ओटी भरून यात्रेस सुरुवात केली जाते. दुसऱ्या दिवशी वाडीतील सर्व आंगणे गावकरी देवीची ओटी भरून दर्शन घेतात. त्याला मोडजत्रा म्हणतात. त्यानंतर सम्राज्ञा होते, देवळाच्या शुद्धीकरण विधी होतात. देवीने जत्रोत्सव सुरळीतपणे पार पाडून घेतला म्हणून देवीप्रती आभार मानल्या जाते. भराडी देवीच्या यात्रेमध्ये धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक सोहळा देखील साजरा केला जातो.
 
आंगणे गावकरी एक नाटक करतात त्याला ' मांडावरचं नाटक' असे म्हटले जाते. देवीसमोर गोंधळ देखील घातला जातो. अनेक राजकारणी नेत्यांसह लाखोंच्या संख्येने भाविक या देवीच्या दर्शनाला येतात. देवीचा प्रसाद हा अत्यंत महत्वाचा असल्याचे मानले जाते. संपूर्ण जनतेसाठी या देवीच्या मंदिराचे कवाड उघडे असतात. या देवीचा प्रसाद आंगणेवाडीतील महिला तयार करतात.
 
या देवी संबंधित भरपूर आख्यायिका प्रचलित आहेत. असेही म्हणतात की, आंगणेवाडीत एकजण चिमाजी अप्पा यांच्या सेवेत गुप्तहेराचे काम करीत होता. त्याच्या स्वामिनिष्ठतेवर प्रसन्न होऊन देवी तुळजाभवानी माता आंगणवाडीच्या भराडावर अवतरली. ही देवी या आंगणे नामक पुरुषाला दिसली नव्हती. परंतु, त्याच्या गाईने ही पाषाण स्वरूपी देवी त्याला दाखवून दिली.
 
देवीचा नवस -
सोन्या- चांदीच्या नाण्यांसह ओटी भरणे, साडी चोळी व नारळाचे तोरण बांधल्या जाते. ज्याचा नवस असेल त्या व्यक्तीच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार केली जाते व देवीला अर्पण केले जाते. याव्यतिरिक्त आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागणे. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून देवीला अर्पण केलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केल्या जाते. त्यानंतर उपवास सोडला जातो. यात्रेच्या दिवशी रात्री ९ वाजतानंतर दर्शन बंद केल्या जाते. मंदिराची स्वच्छता झाल्यानंतर देवीला ताट (देवीचा प्रसाद) वाहल्या जातो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंब उपवास करीत असतात व आंगणे कुटुंबातील सुवासिनी प्रसादाची ताटं घेऊन मंदिराकडे जातात. आंगणे कुटुंबीयातील मुली व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्यासोबत आपल्या घरूनच आणावे, अशी पूर्वापार प्रथा आहे. भराडी देवीची पालखी नाचवितांना भाविकांकडून देवीकडे मोठ्या प्रमाणात नवस बोलले जातात. ते नवस पूर्ण होत असल्याने नवसफेड करण्यासाठी भाविकांना रांग लावावी लागते.
देवीच्या दर्शनाला कसे जावे -
मुंबई-गोवा महामार्गावरून कणकवली येथून आचरा रोड बेळणे फाट्यावरून आंगणेवाडी सुमारे ३५ किमी अंतरावर आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरून कसाल येथून देखील दुसरा महामार्ग बनलेला आहे, तेथून आंगणेवाडी २० किमी अंतरावर आहे.
 
आंगणेवाडीला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन -
१) सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन ३० किमी अंतरावर
२) कणकवली रेल्वे स्टेशन ३७ किमी अंतरावर
 
 
 
 
Disclaimer : या लेखातील माहितीची आणि कथांच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ पौराणिक कथा/ शास्त्रानुसार एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे असून वाचकाने ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. अभिजीत भारत या लेखात लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीवर दावा करत नाहीत.