आज महाराष्ट्रातून दिसणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; 'या' राशीच्या लोकांनी राहावे सतर्क

    08-Nov-2022
Total Views |

lunar eclipse
 
नागपूर :
यंदा दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी आपल्याला यावर्षीचे शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण पाहायला मिळाले. यानंतर आज ८ नोव्हेंबर २०२२ रोजी वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2022) लागणार आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील नागरिकांनाही हे चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हिंदू मान्यतेनुसार, संपूर्ण चंद्रग्रहण असल्यामुळे या दिवसाला कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात. यानंतर पुढील पूर्ण चंद्रग्रहण १४ मार्च २०२५ पर्यंत होण्याची शक्यता नाही, असे नासाचे म्हणणे आहे.
 
आज होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातील पूर्वोत्तर भागातून सर्वाधिक ९८ टक्के आणि तीन तासांसाठी पाहायला मिळणार आहे. तसेच पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे हे खंडग्रास चंद्रग्रहण दृश्यास पडेल. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर गडचिरोली जिल्ह्यातून ०५.३० वाजता तर मुंबई येथून ०६.०१ वाजता चंद्रोदयातच ग्रहण सुरु होईल आणि सर्व ठिकाणी ०७ वाजून २६ मिनिटांनी हे ग्रहण संपेल. राज्यातील पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७० टक्के तर पश्चिम प्रदेश मुंबई येथे केवळ १५ टक्के हे ग्रहण दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. ८ नोव्हेंबरला दिसणारे खग्रास सूर्यग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया उत्तर-दक्षिण अमेरिका, येथील काही भागातून दिसणार आहे.
 
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण होत असते. यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत (Umbra) पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास (Penumbra) तर उप् छायेत चंद्र आल्यास छांयाकल्प (Antumbra) चंद्रग्रहण होते. दरम्यान, पूर्वेतर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल. परंतु चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल.
 
भारतीय वेळेनुसार ८ तारखेला दुपारी ०१.३२ वा छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होऊन ०७.२६ वाजता ते समाप्त होईल. तर खंडग्रास ग्रहण ०२.३९ वाजता सुरु होणार असून ०६. १९ वाजता समाप्त होईल. त्याचप्रमाणे ०३. ४६ वाजता खग्रास ग्रहणाला सुरुवात होईल आणि ते ०५.११ मिनिटांनी संपेल.
 
महाराष्ट्रातील ग्रहणाच्या वेळा
गडचिरोली : प्रारंभ - ०५.२९ वाजता, समाप्ती - ०७.२६ वाजता; कालावधी - सर्वाधिक १ तास ५६ मिनिटे
चंद्रपूर : प्रारंभ - ०५.३३ वाजता,
नागपूर : प्रारंभ - ०५.३२ वाजता,
यवतमाळ : प्रारंभ - ०५.३७ वाजता,
अकोला : प्रारंभ - ०५.४१ वाजता,
जळगाव : प्रारंभ - ०५.४६ वाजता,
औरंगाबाद : प्रारंभ - ०५.५० वाजता,
नाशिक : प्रारंभ - ०५.५५ वाजता,
पुणे : प्रारंभ - ०५.५७ वाजता,
मुंबई : प्रारंभ - ०६.०१ वाजता, समाप्ती - ०७. २६ वाजता
समुद्र किनारी भागात महाराष्ट्रात सर्वात कमी काळ म्हणजे १ तास २५ मिनिटेच ग्रह दिसेल.
 
भारतातील ग्रहण वेळा
भारतात अरुणाचल प्रदेशातून ०४.२३ वाजताच्या सुमारास खग्रास स्थितीतच चंद्रोदय होईल आणि ३ तास ग्रहण दिसेल. तर कोलकाता येथून ०४.५२ वाजतापासून २.३४ तास, पटना येथून ०५.०० वा २.२५ तास, वाराणसी येथून ०५.०९ वा. २.१६ तास, लखनऊ येथे ०५.१५ वा २.१० तास, दिल्ली येथे ०५.३१ वा. १.५८ तास, बिकानेर येथे ०५.५७ वा १.४१ तास, तर भूज येथून ०६.१० वाजता आणि सर्वाधिक कमी काळ १.१८ तास हे ग्रहण दिसेल.
 
ज्योतिषशास्त्राच्या अंदाजानुसार, हे पूर्ण चंद्रग्रहण राशींवर (Zodiac Sign) सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकू शकते. या पूर्ण चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर कसा परिणाम होईल, ते जाणून घेऊया...
 
मेष रास : २१ मार्च ते १९ एप्रिल दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींची मेष रास असते. मेष रास असलेल्या लोकांवर चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते आणि आरोग्याशी संबंधित समस्यांही उद्भवू शकतात. या काळात आर्थिक गुंतवणूक टाळावी.
 
वृषभ रास : वृषभ रास असलेल्या लोकांना या चंद्रग्रहणात संमिश्र परिणाम मिळू शकतात. एकीकडे, तुम्हाला व्यवसायात भरभराट आणि नवीन संधींसह पैसे मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. दुसरीकडे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अपयशाचा सामना करावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या किंवा सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी.
 
कन्या रास : जर तुमची कन्या रास असेल, तर या चंद्रग्रहणात संमिश्र परिणाम अपेक्षित आहेत. कौटुंबिक आणि नातेसंबंधात काही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तथापि, नोकरीमध्ये पदोन्नती, मूल्यांकन आणि अगदी नवीन घर खरेदीसाठी पैसे गुंतवण्याची ही चांगली वेळ आहे.
 
कर्क रास : कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. स्वतःला शांत आणि संतुलित ठेवण्यासोबतच सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
 
मकर रास : मकर राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभ राहील. इतरांचा आदर करा जेणेकरून प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेल. या काळात नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येण्याची चिन्हे आहेत.
 
 
 
 
Disclaimer : या लेखातील माहितीची आणि कथांच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ पौराणिक कथा/ शास्त्रानुसार एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे असून वाचकाने ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. अभिजीत भारत या लेखात लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीवर दावा करत नाहीत.