स्पर्धा परीक्षेची तयारी करताय? मग UPSC चे मोफत प्रशिक्षण हवंय, तर आजच असा करा अर्ज

08 Nov 2022 13:55:14

compitetive
image source internet
 
नागपूर,
 
प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देशसेवा करण्याची इच्छा असणारे शेकडो तरुण आज स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत.
यात काही असेही तरुण आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तरी देखील आपल्या ध्येयासाठी ते अहोरात्र मेहनत करीत आहेत.
 
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक खाजगी शिकवणी वर्ग आहेत. केंद्र शासनाद्वारे देखील प्रशिक्षण दिले जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा 2023 ची तयारी करण्याकरिता भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती औरंगाबाद व कोल्हापूर येथील केंद्रावर निःशुल्क प्रशिक्षण दिल्या जाते. या केंद्रावर प्रवेश मिळण्याबाबतची जाहिरात 4 नोव्हेंबर 2022 च्या वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा रविवार 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 01 या वेळेत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
 
परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करण्याऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 04 नोव्हेंबर 2022 ते 25 नोव्हेंबर 2022 रात्री 12.00 वाजेपर्यंत www.siac.org.in या संकेतस्थळावर भरता येईल. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे.
 
परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती व परीक्षेविषयी सर्व सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छूकांनी प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याचे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0