- माजी आमदार सागर मेघे संमेलनाचे संरक्षक

नागपूर :
विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ताजी मेघे यांची निवड करण्यात आली आहे. तर या संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी माजी आमदार सागर मेघे यांनी स्वीकारली आहे. हे साहित्य संमेलन ३,४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर आयोजित होणार आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारणारे दत्ताजी मेघे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील असल्यामुळे या साहित्य संमेलनाच्या आयोजनात औचित्य साधले गेले आहे, असेही म्हणता येईल.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुमारे ४० वर्षांपासून दत्ता मेघे कार्यरत असून त्यांनी आपल्या राजकारणाचा प्रारंभ महाराष्ट्रातल्या पुलोद सरकारपासून केला आहे. तीन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार म्हणून राजकीय क्षेत्रात वावरताना त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाचे कार्य केले आहे. नागपूर येथे नगर युवक शिक्षण मंडळाची स्थापना करून त्यांनी अभियांत्रिकी आणि उच्च शिक्षणाची पायाभरणी केली. त्याअंतर्गत स्कूल्स ऑफ स्कॉलर्सचे जाळे सर्वत्र उभे करून नागपूरच्याच नव्हे तर विदर्भाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्याशिवाय, दत्ता मेघे मेडिकल सायन्सेस या संस्थेतर्फे सावंगी मेघे येथे भव्य वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली. आज महाराष्ट्रात शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून दत्ता मेघे अग्रगण्य समजले जातात. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकून त्यांचे सुपुत्र सागर मेघे हेही सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे कार्यरत आहेत.
नागपूर येथे २००७ साली विदर्भ साहित्य संघातर्फे संपन्न झालेल्या ८० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी दत्ता मेघे यांनीच स्वीकारली होती. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची आणि संरक्षपदाची जबाबदारी पिता-पुत्राने एकाचवेळी सांभाळणे, ही अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातली एक महत्त्वाची आणि अपूर्व घटना ठरावी.
या साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीकारली असून विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांसह वर्धा येथील साहित्यप्रेमी, कार्यकर्ते या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्याध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर आणि कोषाध्यक्ष विकास लिमये यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.