लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्काराप्रकरणी स्थानिक पत्रकाराला अटक

    05-Nov-2022
Total Views |

rap
image source internet
 
नागपूर :
शहरातील एका स्थानिक पत्रकाराने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३२ वर्षीय स्थानिक पत्रकाराचे नाव अमित वांद्रे असून तो धरमपेठ परिसरातील रहिवासी आहे. अमित वांद्रे हा स्वतःचे स्वतंत्र चॅनेल नागपूर समाचार २४ आणि महाराष्ट्र समाचार २४ चालवतो. तक्रारदार महिलेने अंबाझरी पोलिस ठाण्यात संपूर्ण प्रकरणाची माहिती देत तक्रार दाखल केली. डिसेंबर २०१५ ते जून २०२१ या कालावधी दरम्यान अमित वांद्रे याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि वांद्रे हे २०१४-१५ पासून एकमेकांना ओळखत होते. या दोघांनीही आंबेडकर महाविद्यालयातून शिक्षण घेतले. यादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. वांद्रे याने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिने वांद्रेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास होकार दिला. वांद्रे याने डिसेंबर २०१५ ते जून २०२१ दरम्यान तक्रारदार महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तक्रारदार जेव्हा जेव्हा लग्नाबाबत बोलत असे, तेव्हा वांद्रे याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या तिने अंबाझरी पोलिसात तक्रार दाखल केली.
 

nagpur local journalist 
 (Image Source : Facebook)
 
दरम्यान, अमित वांद्रे याने त्याच्या संपर्काचा पुरेपूर वापर करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, झोन २ पोलिस उपायुक्त डॉ. संदीप पाखले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या तत्पर कारवाईमुळे पीडितेला तक्रार नोंदविण्यात यश आले. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्रकाराला अटक केली असून त्याला ताब्यात घेण्यात आले.
 
दरम्यान, महाराष्ट्र टीव्ही २४ या वृत्तवाहिनीने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सांगितले की, येथे वार्ताहर म्हणून काम करणारे अमित वांद्रे आणि विपणन पदावर कार्यरत मनोज चौहान यांना ६ महिन्यांपूर्वी काढून टाकण्यात आले आहे. महाराष्ट्र टीव्ही २४ चा या दोघांशी काहीही संबंध नाही.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.