सृजन साहित्‍य संमेलनातील कविसंमेलनात फुलले कवितांचे फुलोरे

    28-Nov-2022
Total Views |
kavisammelan of srijan sahitya sammelan
 
‍नागपूर:
 
‘कमवून माणसेही होता अमीर येते, असल्‍या कमाईचा कर सरकार घेत नाही’ अशा विविध भावभावना व्‍यक्‍त करणाऱ्या, ‘प्रेम देता आलं पाहिजे, प्रेम घेता आलं पाहिजे, आयुष्‍यावर भरभरून प्रेम करता आले पा‍हिजे’ सारख्‍या प्रेमकवितांनी कविसंमेलनात कवितांचे फुलोरे फुलत गेले. रसिकांनी टाळ्या, वाहवा, वन्‍समोअर देत कविंचा उत्‍साह वाढवला.
 
साहित्य विहार संस्‍थेच्‍या राज्‍यस्‍तरीय सृजन साहित्य संमेलनाच्‍या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कविसंमेलनाने झाली. अध्‍यक्षपदी संमेलनाध्‍यक्ष डॉ.सदानंद मोरे होते, तर मंडळाचे प्रतिनिधी प्रसिद्ध लेखक प्रसाद कुळकर्णी, स्‍वागताध्‍यक्ष डॉ. मनिषा यमसनवार, साहित्य विहार संस्थाध्यक्ष आशा पांडे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. दत्तप्रसाद जोग, डॉ. प्रसाद कुळकर्णी, संतोष कांबळे, पवन कोरडे, डॉ. प्रसन्न शेंबेकर, मीनल येवले, अंध विद्यालयाचे निवृत्‍त प्राचार्य नरेंद्र ताकसांडे, आबेद शेख या साहित्‍य विहार संस्‍थेच्‍या राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार प्राप्‍त कविंनी यात सहभाग नोंदवला.
 
प्रसन्‍न शेंबेकर यांनी ‘उंबरठा’ या कवितेतून घराचा उंबरठा विरल्‍यामुळे घराचे घरपण कसे सरले, याची व्‍यथा कवितेतून सादर केली तर दत्‍तप्रसाद जोग यांनी ‘निवडुंग’ गझलसंग्रहातील रचना सादर केल्‍या. ‘टाकून पावले मी माघार घेत नाही, आधार देत जातो आधार घेत नाही’, ‘आहे भाव ज्‍याला ते मी लिहित नाही, माझे लिखाण इथला बाजार घेत नाही’ असे शेर सादर करून वाहवा मिळवली. डॉ. प्रसाद कुळकर्णी यांनी प्रेमाच्‍या विविध छटा असलेली कविता सादर करत टाळ्या आणि वन्‍समोअर घेतला. मीनल येवले यांनी ‘बाई आणि माती’ व ‘मी मातीचे फूल’ या कविता सादर केल्‍या तर संतोष कांबळी यांनी ‘उपाशी लेकरू झोपेत हसताना मला दिसले, कदाचित भाबड्या स्‍वप्‍नात त्‍याच्‍या भाकरी आहे’, असे भावपूर्ण शेर सादर केले. आबेद शेख यांनी ‘सुगंधी बाग आहे ती’ ही गझल सादर करून वन्‍समोअर घेतला तर नरेंद्र ताकसांडे ‘स्‍वातंत्र्याचे स्‍मरण’ ही कविता सादर केली. सुचित्रा कातरकर यांनीही कविता सादर केली.
 
डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्‍या कवींची व कवितांची परंपरा थोर आहे असे म्‍हणत आपल्‍या छोटेखानी भाषणातून कवींना शुभेच्‍छा दिल्‍या. आशा पांडे यांनी कविसंमेलनाचे प्रास्‍ताविक व समारोप केला. त्‍यांनी ‘विश्‍वास सर्व माझे खोटे ठरून गेले, ज्‍यांना दिली फुले मी काटे पुरून गेले’ या ‘जग’ या कवितेसह काही शेर सादर केले. सूत्रसंचालन प्रणव हळदे व उज्‍ज्‍वला अंधारे यांनी केले.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.