ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन; सर्वत्र हळहळ व्यक्त

    26-Nov-2022
Total Views |

vikram gokhale
 (Image Source : Internet)
 
पुणे :
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या चित्रपट आणि मालिकांमधील अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेले विक्रम गोखले यांनी आज अखेर जगाचा निरोप घेतला आहे. विक्रम गोखले यांचे शुक्रवारी निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
 
विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ५ नोव्हेंबर रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी रुग्णालयाने सांगितले होते की, विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होताना दिसत आहे. ते डोळे उघडत असून हाता-पायाची हालचाल देखील करत असून त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रियाही स्थिर आहे. त्यामुळे पुढील ४८ तासात त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात येऊ शकते, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते. मात्र, आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयाने आपल्या निवेदनात सांगितले आहे की, पुण्यातील वैकुंठ संस्कार भूमी येथे सायंकाळी ६ वाजता विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. विक्रम गोखले यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कलाकारांपासून ते राजकीय क्षेत्रातील प्रत्येक दिग्गज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.
 
मुख्यमंत्री शिंदेंची अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली
भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच 'विक्रम' करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन ही कला क्षेत्राची हानी आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. हा वारसा त्यांनी दमदारपणे पुढे नेला. मराठीसोबतच त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी, रंगभूमी, दूरचित्रवाणीवरील आपल्या दमदार कामगिरीने आदराचे आणि वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांचीही कलाकाराच्या कलासाधनेत जबाबदारी असते, असे खडसावून सांगणारा सडेतोड भूमिका घेण्याचे धारिष्ट्य दाखवणारा कलाकार म्हणून ते परिचित होते. त्यांनी कसदार अभिनयाने नायक, सहअभिनेता ते चरित्र नायक अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला. अभिनयात 'निशब्द-निश्चल'अशी जागा घेण्याचे कसब असो वा, पल्लेदार संवादफेक त्यातून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. एका प्रतिभावंत मराठी सुपुत्राने भारतीय रंगभूमी, चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या क्षेत्रातील नव्या पिढीला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे एका कलासक्त मार्गदर्शकाची निश्चितच उणीव भासत राहील, ही कला क्षेत्राची हानीच आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!'
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात की, एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व! भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले! अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे.
 
प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्‍या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्‍या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना!
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 'रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवर देखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. अलीकडेच १५ ऑगस्ट रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,' असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.