संतसाहित्‍याला भाषिक व सामाजिक पैलू असतात - डॉ. सदानंद मोरे

    26-Nov-2022
Total Views |

dr sadanand more
 
नागपूर :
संत साहित्‍याला जसे आध्‍यात्मिक पैलू आहे, तसेच त्‍याला भाषिक व सामाजिक पैलू देखील आहेत. समाजातील स्‍त्रियांचा, वंचित घटकांचा उद्धार व्‍हावा, यासाठी संतांनी समाजाच्‍या भाषेत संत साहित्‍य निर्माण केले व समाजाचा उद्धार करण्‍याचे काम केले व समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणले, असे प्रतिपादन संत साहित्‍याचे अभ्‍यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व संमेलनाध्‍यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
 
साहित्य विहार, नागपूर आयोजित दोन दिवसीय राज्‍यस्‍तरीय सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी ईवा (इंडियन वॉटर वर्क्स) सभागृहात संमेलनाध्‍यक्ष व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत पार पडले. संमेलनाचे उद्घाटन साहित्‍य, संस्‍कृती मंडळाचे प्रतिनिधी प्रसिद्ध लेखक प्रसाद कुळकर्णी यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी मंचावर स्‍वागताध्‍यक्ष डॉ. मनीषा यमसनवार, साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, साहित्य विहार संस्थाध्यक्ष आशा पांडे, श्रीकांत गोडबोले, गायक दत्‍ता हरकरे यांचीही व‍िशेष उपस्‍थ‍िती होती. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते साहित्य विहारचा प्रतिष्ठेचा वार्षिक 'ज्ञानयोगी सन्मान' नागपूरच्या सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांना प्रदान करण्‍यात आला.
 
‘संत साहित्‍याचे सामाजिक मूल्‍ये’ या विषयावर बोलताना डॉ. मोरे म्‍हणाले, संत ही महाराष्‍ट्राची देण असून संतत्‍व म्‍हणजे काय याचा विचार महाराष्‍ट्रानेच प्रथम दिला. संत ज्ञानेश्‍वरांची बहीण मुक्‍ताबाईने पहिल्‍यांदा ताटीच्‍या अभंगांमधून संताची व्‍याख्‍या केली. संताला कसे सामाजिक भान असले पाहिजे, हे मुक्‍ताबाईने सांगितले. संत साहित्‍यात सुरुवातीला असलेली सामाजिकता कालांतराने ईश्‍वरवादाकडे वळली. त्‍यामुळे सामाजिक मूल्‍यांकडे संतांचे दुर्लक्ष झाले, अशी खंतही डॉ. मोरे यांनी व्‍यक्‍त केली.
 
प्रसाद कुळकर्णी उद्घाटनपर भाषण करताना म्‍हणाले, साहित्‍यामधून संस्‍कृतीचे प्रतिबिंब उमटत असते. मनामनाचे मिलन म्‍हणजे संमेलन असून सुसंवादातून माणसे जोडून आपण हे संमेलन साजरे करतो आहोत. अनेक आपत्‍ती, समस्‍या, सर्व आव्‍हानांना तोंड देऊन भाषा, संस्‍कृती जपण्‍याचा हा घेतलेला ध्‍यास कौतुकास्‍पद आहे. समाजमाध्‍यमांचा वापर विसंवादासाठी जास्‍त होताना दिसतो आहे. भाषा जगली तर साहित्‍य जगेल साहित्‍य जगले तर संस्‍कृती जगेल आणि संस्‍कृती जगली तर आपण टिकू असेही ते म्‍हणाले.
 
प्रास्‍ताविकातून आशा पांडे म्‍हणाल्‍या, साहित्‍यातून समाजाचे उन्‍नयन करणा-या साहित्‍य‍िकाच्‍या सृजनक्षमतेचा सन्‍मान करणे, हा साहित्‍य विहारचा संकल्‍प आहे. समाजात पसरलेली अशांतता, अस्‍वस्‍थता कमी करण्‍यास मदत करणाऱ्या या लेखकांच्‍या हातातील लेखनी सशक्‍त करण्‍याचे काम साहित्‍य विहार करीत आहे. स्‍वागताध्‍यक्ष मनिषा यमसनवार यांनी इमॅजिनेशन टेक्‍नॉलॉजीला महत्‍व देणारे हे संमेलन असल्‍याचे सांगितले. सत्‍काराला उत्‍तर देताना डॉ. प्रज्ञा आपटे यांनी आयोजकांचे आभार मानले. ज्ञानयोगी सन्‍मान पुरस्‍काराचे प्रायोजक डॉ. श्रीकांत गोडबोले होते. प्रसाद कुळकर्णी यांच्‍या हस्‍ते लघुमाहितीपटाचे उद्घाटन करण्‍यात आले. प्रा. अदिती देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रगती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर दत्‍ता हरकरे यांनी शारदा स्‍तवन सादर केले. सुजाता काळे यांनी आभार मानले.
 
 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.