झुंडच्या बाबुला पोलिसांनी केली अटक; काय आहे नेमके प्रकरण?

25 Nov 2022 13:45:45

babu in jhund arrested by police
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
खेळाच्या माध्यमातून वाईट प्रवृत्ती ही दूर सारून चांगले व्यक्तिमत्व घडू शकते, अशा आशयाचा झुंड चित्रपट काही दिवसांपूर्वीच येऊन गेला. नागपूरचे प्रा. विजय बारसे यांच्यावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीचा ठरला. महानायक अमिताभ बच्चन आणि सुप्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी साकारलेला हा चित्रपट त्याच्या स्टारकास्टमुळे अधिक चर्चेचा विषय ठरला होता. प्रत्येक कलाकाराला एकदम हटके पात्र या चित्रपटात देण्यात आले होते. याच चित्रपटात बाबू छेत्री हे पात्र साकारणारा १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रिय याला मानकापूर पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे.
 
चित्रपटात रेल्वे गाडीतून कोळसा चोरी करणाऱ्या या तरुणाला चित्रपटात काम मिळाल्याने तो वस्तीचा सेलिब्रिटी झाला. मात्र चित्रपटात झळकल्यानंतरही तो पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला आहे. काही वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, झुंड चित्रपटात बाबू छेत्री हे पात्र साकारणाऱ्या प्रियांशूला अटक करण्यात आली आहे.
 
काही दिवसांपूर्वी मानकापूर ठाण्यांतर्गत आंबेडकर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रदीप मोंडावे (६४) यांच्या घरी चोरी झाली. चोरांनी जवळपास ५ लाख रुपयांच्या मालावर हात साफ केला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सर्वप्रथम एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात प्रियांशूचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चोरीच्या मालाबाबत विचारले असता प्रियांशूने गड्डीगोदाममध्ये कबूतरच्या पेटीत लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याने सांगितल्यानुसार, पोलिसांनी दागिने आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानही अचानक प्रियांशू गायब झाला होता. चौकशीत तो नागपूर कारागृहात बंद असल्याची माहिती मिळाली होती. प्रियांशू आणि त्याच्या साथीदारांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल फोन चोरी केले होते.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0