Constitution Day : पंतप्रधानांच्या हस्ते ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांचा प्रारंभ

    25-Nov-2022
Total Views |

pm modi to participate in constitution day
 (Image Source : Internet)
 
नवी दिल्ली :
संपूर्ण देशभरात शनिवारी 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील. संविधान सभेने 1949 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानिमित्त हा दिवस 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रमांचा प्रारंभ करतील. हा प्रकल्प न्यायालयांच्या आयसीटी अर्थात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान सक्षमीकरणाद्वारे याचिकाकर्ते, वकील आणि न्यायपालिका यांना सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणाऱ्या उपक्रमांमध्ये व्हर्च्युअल जस्टिस क्लॉक, JustIS मोबाईल ॲप 2.0, डिजिटल कोर्ट आणि S3WaaS संकेतस्थळ यांचा समावेश आहे.
Virtual Justice Clock 
Virtual Justice Clock (वास्तविक न्याय घड्याळ) हा न्यायालय स्तरावरील न्याय वितरण प्रणालीची महत्त्वाची आकडेवारी प्रदर्शित करण्याचा उपक्रम आहे, ज्यामध्ये न्यायालय स्तरावर दिवस/ आठवडा/ महिना आधारावर दाखल केलेल्या याचिका, निकाली काढण्यात आलेल्या याचिका आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती दिली जाते. न्यायालयाद्वारे खटल्यांची स्थिती लोकांसोबत सामायिक करून न्यायालयांचे कामकाज उत्तरदायी आणि पारदर्शक करण्याचा हा प्रयत्न आहे. जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर कोणत्याही न्यायालय आस्थापनेच्या व्हर्च्युअल जस्टिस क्लॉकमध्ये नागरिकांना ही माहिती मिळू शकेल.
JustIS Mobile App 2.0 
JustIS Mobile App 2.0 हे ॲप न्यायिक अधिकार्‍यांना केवळ त्यांच्या न्यायालयाच्याच नव्हे तर त्यांच्या अंतर्गत काम करणार्‍या न्यायाधीशांच्या प्रलंबित खटल्यांवर देखरेख ठेवणे आणि ते निकाली काढणे, याद्वारे प्रभावी न्यायालय आणि खटल्यांच्या व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेले साधन आहे. हे ॲप उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे, जे आता त्यांच्या अखत्यारीतील सर्व राज्ये आणि जिल्ह्यांच्या प्रलंबित खटल्यांवर लक्ष ठेवू शकतात.
Digital Court
न्यायालयांचे रूपांतर कागदविरहित न्यायालयांमध्ये शक्य व्हावे यासाठी डिजीटल न्यायालय हा न्यायालयीन अभिलेख न्यायाधीशांना डिजीटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आहे.
S3WaaS Website 
S3WaaS वेबसाइट्स अर्थात संकेतस्थळे ही जिल्हा न्यायव्यवस्थेशी संबंधित निर्दिष्ट माहिती आणि सेवा प्रकाशित करण्यासाठी संकेतस्थळे तयार करणे, उपयोजन आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक आराखडा आहे. S3WaaS ही सरकारी संस्थांसाठी सुरक्षित, श्रेणीयोग्य आणि सुगम्य संकेतस्थळे तयार करण्याकरिता विकसित केलेली क्लाउड सेवा आहे. ही बहुभाषिक, नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी वापरण्यास सुलभ आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.