FDA विभागाची मोठी कारवाई! १ कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त

    24-Nov-2022
Total Views |

fda seized gutkha and tobacco products
(Image Source : Twitter)
 
मुंबई :
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भिवंडीत मोठी कारवाई केली आहे. FDA विभागाने सुमारे 1 कोटी 8 लाख 97 हजार 520 रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
 
अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास आंबाडी -भिवंडी रोडवर मडक्याचा पाडा येथे नारायण फार्मच्या बाजूला टाटा आयशर (MH०४-HD-३०२८) टेम्पोची पाहणी केली. टेम्पोमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ विमल पानमसाला, शुद्ध प्लस पानमसाला, व्ही -1 तंबाखू, नावी तंबाखू असा सुमारे 1 कोटी 8 लाख 97 हजार 520 रूपयांचा साठा आणि वाहन (किंमत अंदाजे ८ लाख) ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थ मुंबईकडे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने टेम्पोचा चालक परमेश्वर संपत ढाकरगे, वाहनाचे मालक राजेश राजू शेटीया, राजकुमार सपाटे, शौकत अली पठाण आणि राजेश गुप्ता यांच्याविरूद्ध भारतीय दंड कलम 188, 272, 273, 328 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चे कलम 59 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक केल्याप्रकरणी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहनचालकाचा वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या आदेशानुसार आणि अन्न व औषध आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या सूचनेनुसार, सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
 
अन्न व औषध प्रशासनाने 1 एप्रिल ते 21 नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील 173 आस्थापनांची तपासणी केली असता 142 ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा 1 कोटी 72 लाख 7 हजार 486 रुपयांचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला. संबंधित कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व संबंधितांविरुद्ध 58 गुन्हे (FIR) नोंदवण्यात आलेले आहेत, तर 129 आस्थापना सील करून दोन वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.