गोवरचा विळखा वाढतोय...

    24-Nov-2022
Total Views |

goavr
(Image Source : Internet)
 
मागील दोन वर्षात आपण कोरोना नामक महामारीला तोंड दिले. कोरोना सारख्या जागतिक महामारीला देशातून हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागासह सर्व विभागांनी जीवाचे रान केले. केंद्राने जेव्हा कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली त्यानंतर कोरोना महामारीचा धोका कमी झाला. आज कोरोना भारतातून जवळपास हद्दपार झाला आहे. कोरोनावर विजय मिळवल्याचा आनंद साजरा करत असतानाच लम्पि नामक विषाणूजन्य आजाराने जनावरांना विळखा घातला. लम्पिमुळे शेकडो जनावरे मृत पावली. पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेले पशुधन लम्पिच्या विळख्यात अडकल्याने शेतकरी व गोपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यावर पशुसंवर्धन विभागाने जनावरांना लम्पि विरोधी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. अजूनही लंम्पिची आजार संपलेला नसतानाच गोवर नामक साथीच्या आजाराने विळखा घालण्यास सुरूवात केली आहे.
 
मुंबई, गोवंडी, भिवंडी, मालेगाव, नाशिक या शहरात लहान बालकांमध्ये गोवर हा साथीचा आजार वाढत असल्याचे दिसून आले. गोवरचे राज्यात तीन हजारांच्या आसपास संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले असून या आजाराने राज्यात दहा बालके दगावली असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. विशेष म्हणून गोवर हा बालकांना होणारा आजार असला तरी मुंबईत दोन प्रौढांनाही हा आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ताप, सर्दी, खोकला आणि अंगावर पुरळ येणे हे या आजाराचे लक्षण असल्याचे बालरोग तज्ज्ञ सांगत आहेत. अर्थात गोवर हा धोकेदायक आजार नसल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. गोवरची साथ येण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे मागील दोन वर्षात मुलांचे रखडलेले लसीकरण. गोवरच्या संशयित रुग्णांपैकी ५० टक्के बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलेली नाही.
 
कोरोनामुळे मागील दोन वर्षात अनेक बालकांचे लसीकरण रखडले आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी लसीकरण बंद होते तर काही पालकांनी कोरोनाच्या भीतीने मुलांचे लसीकरण टाळले. बालकांना वेळेत गोवर प्रतिबंधक लस न मिळाल्यानेच गोवरची ही साथ आली आहे. अर्थात आरोग्य विभागाने गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गोवरच्या रुग्णांच्या उपचारासाठी अतिरिक्त वॉर्डची स्थापना करण्यात आली असून गोवरच्या रुग्णांना आवश्यक असणारा पुरेसा औषध साठा रुग्णालयांना पोहोचविण्यात आला आहे. ज्या बालकांना ताप, खोकला आणि अंगावर पुरळ येत आहेत अशा बालकांच्या पालकांनी बालकांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्याचे आव्हान राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. गोवरचा विळखा आणखी वाढू नये, ही साथ आटोक्यात यावी यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. ठिकठिकाणी लसीकरणाचे कॅम्प सुरू केले आहेत. सहा महिन्यांच्या बाळाला देखील गोवर प्रतिबंधक लस देता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे.
 
सरकारच्या या प्रयत्नांस नागरिकांनीही साथ द्यावी. ज्या बालकांनी अद्याप गोवर प्रतिबंधक लस घेतली नसेल त्यांनी त्वरित या लसीचा डोस घ्यावा. गोवरची लक्षणे दिसताच रुग्णालयात धाव घ्यावी. कोणताही आजार अंगावर काढू नये. सरकारच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिल्यास गोवरची साथ नक्कीच आटोक्यात येईल आणि बालकांची या आजारातून सुटका होईल.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.