कन्हानमध्ये बिबट्या आढळला मृत अवस्थेत

    23-Nov-2022
Total Views |

leopard found dead in kanhan nagpur
 
नागपूर:
रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत नियत क्षेत्र कन्हानमधील करण पिपरी अंतर्गत पद्माकर शेंडे यांच्या शेत शिवारामध्ये एक बिबट मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत आणि वन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून मोका पाहणी करून पंचनामा नोंदविला. तसेच मृत बिबट हा नर असून, अंदाजे वय सहा वर्षाचे होते, अशी माहिती यावेळी रामटेकचे आरएफओ अनिल भगत यांनी दिली.
 
सदर बिबट हा कन्हान पिपरी येथील कास्तकार पद्माकर शेंडे यांच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, रामटेकचे सहायक वनसंरक्षक हरवीर सिंह यांनी मोकास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत बिबटचे सर्व अवयव साबूत होते. सदर घटनेची माहिती नागपूरचे उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांना देण्यात आली. वनविभागाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर पायी फिरून पाहणी केली. परंतु, संदिग्ध काहीच आढळून आले नाही.
 
 
सदर प्रकरणी वन गुन्हा नोंदविण्यात आलेला असून, मृत बिबटचे शव उत्तरीय तपासणीकरिता ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर सेमिनरी हिल्स नागपूर येथे पाठविण्यात आले. लॅबोरेटरीमध्ये फॉरेन्सिक तपासणीकरिता पाठविण्याकरिता मृत बिबटचे नमुने घेण्यात आले. डॉक्टरांकडून बिबट्याच्या शवाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार एनटीसीएचे प्रतिनिधी कुंदन हाते, गिरीश नाखले तसेच हरवीर सिंह, अनिल भगत, पटगोवारीचे क्षेत्र सहायक ए. सी. दिग्रसे, वनरक्षक एस. जे. टेकाम उपस्थित होते. पुढील तपास दिग्रसे करीत आहे. 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.