गोवा पर्यटन विभागाची युवराज सिंगला नोटीस; काय आहे प्रकरण जाणून घ्या

    23-Nov-2022
Total Views |
 
goa tourism department sent notice to yuvraj singh
 (Image Source : tw/@YUVSTRONG12)
 
पणजी :
 
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याच्या अडचणीत वाढ झाली आहे. गोव्याच्या पर्यटन विभागाने युवराज सिंगला नुकतीच नोटीस बजावली आहे. युवराजचा मोरजिम येथे एक व्हिला असून विना नोंदणी हा व्हिला 'होमस्टे' म्हणून चालवण्याबद्दल ही नोटीस देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
गोवा पर्यटन व्यवसाय कायदा, १९८२ अंतर्गत नोंदणी केल्यानंतरच राज्यात 'होमस्टे' चालवण्याची परवानगी असते. मात्र, युवराज व्हिलाची नोंदणी न करता त्याचा 'होमस्टे' म्हणून वापर करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. युवराजला धाडण्यात आलेल्या नोटीसमध्ये पर्यटन व्यापार कायद्यांतर्गत मालमत्तेची नोंदणी न केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
 
राज्याच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक राजेश काळे यांनी १८ नोव्हेंबर रोजी उत्तर गोव्यातील मोरजिम येथे असलेल्या युवराजच्या मालकीच्या व्हिला 'कासा सिंग' या पत्त्यावर नोटीस बजावली होती. यामध्ये युवराजला ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वैयक्तिक सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात दोषी आढळल्यास युवराजला १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.