ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात; 'अशी' आहे यंदाची थीम

    22-Nov-2022
Total Views |

agrovision
 
नागपूर :
विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची जोडधंद्यांची माहिती व्हावी, त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी, या हेतूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाला लवकरच सुरुवात होणार आहे. यावर्षी होणारे १३ वे ॲग्रोव्हिजन असून यंदा त्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. यंदा दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर येत्या २५ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे चार दिवसांचे हे कृषी प्रदर्शन होणार आहे. राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, एकदिवसीय परिषदा असे स्वरूप असणाऱ्या ॲग्रोव्हिजनची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
 
शेतकरी, शेती तज्ज्ञ, कृषी प्रेमी अशा एकूणच मांदियाळीसाठी ७,८०० चौरस मीटर जागेवर प्रदर्शनाचे डोम, मोठ्या उपकरणांसाठी ४,५०० चौरस मीटरचे ओपन हँगर उभारण्यात आले असून कार्यशाळांसाठी ३२५ चौ.मी.चे तीन हॉल्स असा एकंदर १३ हजार चौरस मीटर परिसर प्रदर्शनाने व्याप्त आहे. शेतकऱ्यांच्या नावनोंदणीसाठी दोन काउंटर्स तयार करण्यात आले आहेत.
 
दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू होत असलेल्या ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात तीन परिषदांसह विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथांपासून प्रेरणा घेण्याची संधी यातून शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा अनेक विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. यातील काही कार्यशाळा या जास्त कालावधीच्या असतील. कृषी क्षेत्रात ड्रोनचा उपयोग, फुलशेती, भाजीपाला बियाणे उत्पादन, हळद आणि आलं लागवड आणि प्रक्रिया, बांबू लागवड, औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, कृषी रसायनांचा योग्य वापर, व्हर्टीकल फार्मींग, लहान शेतीसाठी यांत्रिकीकरण, रेशीम शेती, शेळी-मेंढी पालन, मधमाशी पालन, सेंद्रिय शेती, संत्रा आणि मोसंबी यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, विदर्भातील ॲग्रोटुरिझमच्या संधी, मशरुम उत्पादन, विदर्भातील कुक्कुटपालन, उत्पादन संधी आणि आव्हाने अशा अनेक विषयांचा समावेश आहे.

agrovision
 
यंदाच्या ॲग्रोव्हिजनमध्ये ४२५ स्टॉल्स
पाच डोममधून सुमारे ४२५ स्टॉल्स कृषी प्रदर्शनात राहतील. सोबतच शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते, कृषी विषयक उपकरणे, आधुनिक कृषी उपकरणांची माहिती देणारे स्टॉल्स, नाबार्डसह इतर बँक्स आणि कृषी विषयक सरकारी विभागांचा व्हिजनमध्ये समावेश असणार आहे. यावर्षी युपीएल, एएसॲग्री, पतंजली, पीआय इंडस्ट्रिज, महिको आयटीसी, रिलायन्स, महिंद्रा, अंकुर सिड्स, घारडा केमिकल्स, इंडियन ऑईल कॉरपोरेशन लि., रासी सिड्स, व्ही. एच. ग्रुप, पारिजात इंडस्ट्रिज, क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन, धानुका, मेडा, कुबोटा अशा अनेक मोठया संस्थांनी प्रदर्शनात आपला सहभाग निश्चित केला आहे.
 
विदर्भाच्या डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी विदर्भाचा दुग्ध विकास, विदर्भात मत्स्य व्यवसायाचा विकास, तसेच बांबू उत्पादनातून उत्पन्नाच्या संधी या विषयांवर परिषद आयोजित करण्यात आल्या आहे परिषदांचे आयोजन एनबीएसएसएलयुपी हॉल तसेच पीडीकेव्ही ग्राउंड, दाभा, नागपूर या दोन ठिकाणी करण्यात आले आहे. अशी माहिती या सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ॲग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, आयोजन सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर, यांच्यासह ॲग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी.मायी, ग्रोव्हिजन फाउंडेशन चे सदस्य सुधीर दिवे, आनंदराव राऊत, प्रशांत कुकडे, शिरीष भगत, श्रीधर ठाकरे, डॉ. सुनील सहातपुरे, डॉ. के. डी. ठाकूर, समय बनसोड, प्रशांत वासाडे, पिनाक दंदे, मोरेश्वर वानखेडे, आनंदबाबू कदम, राम मुंजे, कृषी महाविद्यालयाचे डॉ. आर. एन. काटकर, डॉ. इलोरकर, डॉ. वि. खवले, डॉ. हितेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुरूवात होईल. ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेतील उद्घाटन सोहळ्याला मध्य प्रदेशचे मुख्य मंत्री शिवराजसिंग चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रदशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या समारोप समारंभाला मध्यप्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल उपस्थित राहणार आहे.
 
शेतकरी, उत्पादक, ग्राहक, कृषी विद्यार्थी आणि कृषीप्रेमी अशा प्रत्येकाने या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी तसेच शेतकऱ्यांनी कार्यशाळा व परिषदांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.