भारत तैवान मैत्री पर्वास सुरुवात

    22-Nov-2022
Total Views |

 India Taiwan friendship festival begins
(Image Source : tw/@TWIndia2)
 
तैवान हा आशिया खंडातील एक छोटासा देश. चीन आणि तैवान या दोन्ही शेजारी देशात विस्तव जात नाही. कारण, चीनच्या मते तैवान हा चीनचाच भूभाग असून तैवान हे स्वतंत्र राष्ट्र नाही. याउलट तैवान मात्र चीनचा हा दावा खोदून काढत, 'आम्ही चीनचे गुलाम नसून आमचे राष्ट्र स्वतंत्र आहे. आमचे सार्वभौमत्व आम्ही जपणार आहोत. चीनने आमच्यावर अधिकार सांगू नये.' अशी ठाम भूमिका घेतली आहे. यावरून, चीन आणि तैवानमध्ये कायम संघर्ष सुरू असतो. चीन जरी तैवानचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला तयार नसली, तरी जगातील अनेक देशांनी तैवानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला आहे. त्यासाठीच मध्यंतरी अमेरिकन सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पॉलिसी या तैवानमध्ये आल्या होत्या.
 
नॅन्सी पॉलिसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीन चांगलाच खवळला होता. त्याने तैवान सीमेवर सैन्याची जमवाजमव करून तैवानला इशारा दिला होता. मात्र चीनच्या या इशाऱ्याला छोट्याश्या तैवानने भीक घातली नाही. उलट 'शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र' या म्हणीप्रमाणे, तैवानने चीनच्या शत्रूंशी संधान बांधायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून, तैवानचे उपवित्तमंत्री चेन चर्ण यांनी नुकताच भारताचा दौरा केला. या दौऱ्याविषयी प्रसार माध्यमात जास्त चर्चा झाली नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दौरा विशेष चर्चेचा ठरला.
 
सध्याचे जग हे दोन गटात विभागले गेले आहेत. चीन, रशिया, उत्तर कोरिया, इराण यासारखी आक्रमक राष्ट्रे एका बाजूला. तर, अमेरिका, इंग्लंड, इस्राईल आणि नाटो राष्ट्रे दुसऱ्या बाजूला. अर्थात भारताने अजूनही कोणाची बाजू घेत, थेट कोणत्याच गटात सामील झाला नसला तरी, भारताची भुमीका या सर्व घडामोडीत महत्वाची ठरणार आहे. भारताला नुकतेच जी २० गटाचे अध्यक्षपदही मिळाले आहे. त्यामुळे, भारताच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागले आहे. कदाचित त्यामुळेच तैवानच्या उपवित्त मंत्र्याच्या भारत दौऱ्यावर जगात चर्चा होत आहे. तैवानच्या उपवित्त मंत्र्यांच्या भारत दौऱ्यानंतर चीनचा नेहमीप्रमाणे तिळपापड झाला, हे वेगळे सांगायला नको. या दौऱ्यानंतर चीनने भारतासह तैवानवर आगपाखड केली. अर्थात, चीनच्या आगपाखडीला भारत आणि तैवानने भीक घातली नाही.
 
या दौऱ्यात भारत आणि तैवान दरम्यान ३० एमओयु वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशात अनेक महत्वाचे करार झाले आहेत. सध्या भारत हा तैवानच्या कंपन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे. मागील काही दिवसात, फॉक्सकॉन या तैवानच्या मोठ्या कंपनीने वेदांता सोबत गुजरातमध्ये देशातील पहिला सेमी कंडक्टर सुरू करण्याच्या दृष्टीने, पहिले पाऊल टाकले आहे. आणखी एक तैवान कंपनी पेगाट्रेनने सुद्धा तामिळनाडूमध्ये एपलच्या उत्पादनाशी संबंधित प्रकल्प सुरू केला आहे. एकूणच भारत आणि तैवान मैत्री पर्वास आता सुरवात झाली आहे. अर्थात, ती काळाची गरजही आहे. कारण, दोघांचा समान शत्रू एकच आहे, तो म्हणजे चीन.
 
चीन सध्या जागतिक महासत्ता आहे. चीनशी एकट्याने मुकाबला करणे कोणत्याही देशाला शक्य नाही. त्यामुळेच, चीन अन्य देशांवर दादागिरी करीत आहे. चीनची ही दादागिरी मोडून काढायची असेल, तर सर्व राष्ट्रांना एकत्र यावेच लागेल. कदाचित त्यासाठीच अमेरिकेच्या नॅन्सी पॉलिसी यांनी तैवानला भेट दिली होती. आता तैवानच्या उपवित्त मंत्र्याच्या भारत दौरा हे त्याचेच पुढचे पाऊल असू शकते. चीनच्या आक्रमकतेला तैवान आणि भारत एकत्र आल्यास आव्हान मिळू शकते. म्हणूनच, हा दौरा आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाचा मानला जात आहे.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.