फुटबॉलचा कुंभमेळा

    21-Nov-2022
Total Views |
 
fifa world cup 2022
 (Image Source : Internet)
 
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ. जवळपास जगातील सर्वच देशात खेळला जाणारा हा खेळ आहे. म्हणूनच, फुटबॉलला खेळांचा राजा असे म्हणतात. दर चार वर्षांनी फुटबॉल खेळणारे जगातले सर्वोत्तम ३२ संघ एकमेकांना भिडतात आणि त्यातील एक संघ अंतिम सामन्यात विजयी होऊन विश्वविजेता ठरतो, यालाच आपण विश्वचषक स्पर्धा म्हणतो. फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा समजली जाते. हीच विश्वचषक स्पर्धा कालपासून (२० नोव्हेंबर) आखाती देशातील कतार या देशात सुरु झाली असून, यजमान कतार आणि इक्वेडर या देशांत या विश्वचषकाचा पहिला सामना खेळवला गेला. मध्यपूर्व देशात पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित केल्याने मध्यपूर्व राष्ट्रांसह संपूर्ण आशिया खंडात उत्साहाचे वातावरण आहे.
 
२० नोव्हेंबरला सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम ३२ संघ उतरणार असून जवळपास तीनशेहुन अधिक खेळाडू आपल्या देशाला विश्वविजयी करण्यासाठी एकमेकांशी झुंजणार आहेत. या ३२ संघाची ८ गटात विभागणी केली असून ३२ पैकी १६ संघ पुढच्या फेरीत जातील. म्हणजेच प्रत्येक गटातून २ संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील. त्या १६ संघातून आठ संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील तर त्यांच्यातील चार संघ उपांत्यफेरीत प्रवेश करतील. उपांत्यफेरीतील विजयी संघ अंतिम फेरीत एकमेकांशी भिडतील आणि त्यांच्यातील विजयी संघ विश्वविजयी होईल. प्रत्येक फेरीगणिक चुरस वाढत जाऊन स्पर्धा रंगतदार होईल. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागतील. एखाद्या बलाढ्य संघास अनपेक्षितपणे पराभवास सामोरे जावे लागेल तर एखादा नवखा संघ अपेक्षा नसताना धक्कादायक निकाल लावून जगाचे लक्ष वेधून घेईल.
 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ब्राझील, फ्रांस, इंग्लंड, नेदरलँड, जर्मनी या देशांना विजयाची अधिक संधी असली तरी, अर्जेंटिना, बेलजीयम, स्पेन हे देश देखील विजेतेपदाचे प्रमुख दावेदार आहेत. स्वित्झर्लंड, कॅमेरून, सर्बिया, पोर्तुगाल, उरुग्वे, घाणा, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाही. एकूणच ही विश्वचषक स्पर्धा आजवरची सर्वात रोमहर्षक विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखली जाईल. ही विश्वचषक स्पर्धा अनेक बड्या सिताऱ्यांची शेवटची विश्वचषक स्पर्धा असू शकते. फुटबॉलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जाणारा, अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा आहे. त्याने आपल्या देशासाठी आजवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करून, सर्व स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र, अद्याप आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकता आला नाही.
 
सचिन तेंडुलकरने आपल्या शेवटच्या स्पर्धेत देशाला क्रिकेटचा विश्वचषक जिंकून दिला. तसा मेस्सीने अर्जेंटिनाला हा विश्वचषक जिंकून द्यावा, अशी अपेक्षा अर्जेंटिनाचे नागरिक व्यक्त करीत आहेत. अर्थात मेस्सी देखील आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देण्यासाठी जीवाचे रान करणार, यात शंका नाही. पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो याचाही हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे तो ही जीवाचे रान करणार. जर्मनीचा थॉमस मुल्लर या विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होऊ शकतो त्यामुळे तो ही आपला शेवट गोड करू इच्छितो. याशिवाय रॉबर्ट लेवानडोस्की, लुईस सुरेझ, अँजल डी मारिया, लुका मोड्रायन, करीम बेंसोना या स्टार खेळाडूंचा हा शेवटचा विश्वचषक असल्याने ते आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत. अर्थात या स्पर्धे नंतर काही महान खेळाडू जसे अस्तंगत होतील तसेच काही नवे खेळाडूही उदयासही येतील. एकूणच पुढील महिनाभर फुटबॉल प्रेमींसाठी धमाल असणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर अवघं क्रीडाविश्व फुटबॉलच्या या कुंभमेळ्यात न्हाऊन निघणार आहे हे नक्की!
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.