पोलिस चोराला शोधत होते बाहेर अन् तो निघाला...

    02-Nov-2022
Total Views |

chori
image source internet 
 
नागपूर,
संपूर्ण कुटुंब घराला टाळा लाऊन बाहेर गेलं. काही तासांनी परत आल्यावर त्यांनना घरात चोरी झाल्याचे कळले. त्वरित पोलिसांना फोन करून बोलाविण्यात आले. पोलिसांनी तपासणी केल्यावर समजले की ही चोरी चक्क ७३ लाखांची आहे. पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला आणि अवघ्या काही तासात पोलिसांना चोराला पकडण्यात यश आले. ही नाट्यमय घटना नागपुरातील शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत घडली.
चोरट्यांनी घरफोडी करून घरातून ६० लाखांचे सोन्याचे दागिने व १३ लाख रुपयांची रोख अशी चक्क ७३ लाख रुपयांची रक्कम इलेक्ट्रॉनिक लॉकर उघडून चोरली. या चोरट्यांना पोलिसांनी काही तासांमध्येच अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील प्लॉट नंबर एच ३, महेशनगर, कश्यप कॉलोनी, शांतीनगर येथे राहणारे फिर्यादी जावेद अब्दुल रज्जाक थारा (वय ५६) हे त्यांच्या घराला कुलूप लावून परिवारासह कामठी येथे सगाईच्या कार्यक्रमाला गेले होते. यादरम्यान, आरोपींनी इलेक्ट्रॉनिक लॉकर उघडून त्यामधील १३ लाख रुपये रोख व ६० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी जेव्हा सगाईच्या कार्यक्रमातून घरी परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसून आले.
 
घरात चोरी झाल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी कपाटात ठेवलेली रोख आणि सोन्याचे दागिने दिसून आले नाही. त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. घटना स्थळी पोचल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि चोर घरातच असल्याचे निष्पन्न झाले. घरफोडीत तक्रारकर्त्याचा मुलगा आणि दुकानात काम करणारा आरोपी निघाला.