Bolg: बाळासाहेब सांगा कुणाचे ?

...वार-पलटवार

    19-Nov-2022
Total Views |

balasaheb thackeray
image source internet 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जाऊन दहा वर्षे झाली. त्यांचं स्मरण करताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की, जात नावाचं प्रकरणच या माणसानं बासनात बांधून ठेवलं होतं ! त्यांचं हिंदुत्व कोणाला भावत नसेल. त्यांचा मराठी बाणा कोणाला आवडत नसेल. त्यांचा डाव्यांना विरोध, काॅंग्रेसला विरोध कोणाला रुचत नसेल.‌ पण, सर्वांनाच आवडावी अशी एक गोष्ट त्यांच्याकडे नक्कीच होती. ती म्हणजे, अर्धशतकाच्या दीर्घ सामाजिक-राजकीय कारकीर्दीत त्यांनी जातीपातीचा कधीच विचार केला नाही.‌
 
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 'जाती तोडो' ची कल्पना बाळासाहेबांनी प्रत्यक्षात आणून दाखविली. अन्य कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा नेत्यानं व्यवहारात ही गोष्ट इतक्या ताकदीनं करून दाखविल्याचं उदाहरण नाही. अनेक नेते यासंदर्भात 'तोंडपाटीलकी' खूप करतात. पण प्रत्यक्ष तेवढ्या कठोरपणे वागत नाहीत, हाच आपला आजवरचा अनुभव आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील बाळासाहेबांचं हे योगदान विलक्षण आणि कधीही विसरता न येण्यासारखं आहे. गेल्या अर्धशतकातील शिवसेनेचे खासदार, आमदार वा इतर पदाधिकारी यांची यादी डोळ्याखालून घातली तरी ही गोष्ट सहज लक्षात येते. एखाद्या मतदारसंघात अत्यल्प संख्या (लाखो मध्ये फक्त काही हजार !) असलेल्या समाजाच्या शिवसैनिकाला सहज उमेदवारी देण्याचा आणि स्वत:च्या नावावर त्याला निवडून आणण्याचा 'चमत्कार' बाळासाहेबांनी अनेकदा करून दाखविला. हेच खरं हिंदुत्व होय.‌
 
स्वजातीच्या गठ्ठा मतांच्या भरोशावर प्रस्थापित झालेल्या अनेक मोठ्या राजकीय नेत्यांना तेच खुपत होतं. याचं प्रस्थ वाढलं, तर आपल्या जातीपातीच्या राजकारणाचा बॅंडबाजा वाजणार, हे त्यांना दिसत होतं.‌ म्हणून तर ते बाळासाहेबांना विरोध करायचे.‌ व्यक्तिगत मैत्री असूनही शरद पवारांनी त्यांच्याशी राजकीय अंतर कायम ठेवलं, याचं हे खरं कारण आहे. मात्र, नेता बदलून धोरणात ढिलाई आल्याचं जाणवताच, त्याच शिवसेनेला आपल्या गोटात ओढून खिळखिळी करण्याचा डाव पवारांनी साधला, हे आपण पाहतोच आहोत.
याच्या परिणामी सर्वसमावेशक हिंदुत्वाचा शिवसेना पक्ष दोन गटात विभागला जाऊन, बाळासाहेबांचाच वारसा सांगणारे दोन प्रमुख दावेदार निर्माण झाले. एक पुत्र उद्धव ठाकरे, दुसरे शिष्य एकनाथ शिंदे. या दोघांचीही राजकीय लढाई सध्या सुरू आहे.
 
तथापि, बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ शिंदे सैनिकांनी विटाळल्याच्या भावनेतून ठाकरे सैनिकांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापर्यंत या दावेदारीची मजल जावी, हे वाईटच. याच निमित्तानं गद्दारी, खंजीर यांचाही पुन्हा उद्धार झाला. पण, ज्या व्यापक हिंदुत्वाचा यशस्वी प्रयोग बाळासाहेबांनी सिद्ध केला, त्याचं काय ? हिंदुत्व शब्दाचाच विटाळ असलेल्या काॅंग्रेस, राष्ट्रवादी, डावे आदी सेक्युलर मंडळींसोबत बसून तो वारसा सांगता येईल का ? आणि, दुसऱ्यांना तो नाकारता येईल का ? बाळासाहेब हे फक्त एका पक्षाचे संस्थापक नव्हते. नेता, पत्रकार, व्यंग्यचित्रकार या तीनही भूमिकांमध्ये ते हिंदुत्वाचे आणि मराठी बाण्याचे मानबिंदू होते. याआधारे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचाच बाळासाहेबांवर तेवढाच अधिकार होता, आहे. त्यामुळे बाळासाहेब फक्त शिवसेनेचे नाही, सर्वांचे आहेत. कोणीही यासंदर्भात दुसऱ्याला अटी घालण्याच्या भानगडीत पडू नये.‌ त्यापेक्षा त्यांचे आदर्श जपण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे 'बाळासाहेब आमचेच' म्हणण्याची पाळी येणार नाही अन् तसे ओरडून सांगावेही लागणार नाही.

विनोद देशमुख
ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत
 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.