Sitaphal Dessert Recipe : हंगामी फळ सीताफळपासून बनवा 'हा' चविष्ट गोड पदार्थ

18 Nov 2022 18:39:41

sitaphal rabdi
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
हिवाळ्यात बरेच हंगामी फळ बाजारात येतात. त्यापैकीच एक म्हणजे सीताफळ. सहसा लहानांपासून ते वृद्धांपर्यंतच्या सर्वच लोकांना सीताफळ आवडते. आरोग्यासाठी देखील सीताफळाचे अनेक फायदे आहेत. सीताफळ शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास, जळजळ कमी करण्यास मदत करते. पण नुसते फळ खाण्यापेक्षा सीताफळापासून एखादे डेजर्ट बनवले तर ते सर्वांनाच खावेसे वाटते. त्यातही हिवाळ्यात सीताफळाची रबडी म्हणजे अमृत मिळाल्यासारखे आनंद देते. तुम्ही देखील या हिवाळ्यात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सीताफळाची रबडी ट्राय करून बघू शकता. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण रेसिपी...
 
साहित्य :
सीताफळाचा गर - २ वाट्या (बिया काढून घेतलेला)
दूध - १ लिटर
साखर - पाव कप
दूध मसाला - १/२ चमचा
वेलची-जायफळ पूड - आवडीनुसार
कृती :
सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध काढून मंद आचेवर गरम करा. अधूनमधून दुधाला ढवळत राहा. दूध हलके गरम झाले की त्यात साखर, दूध मसाला आणि वेलची-जायफळ पूड घालून ढवळून घ्या. १० मिनिटांपर्यंत उकळी आल्यानंतर दुष्ट थोडा आटवून घ्या. गॅस बंद करून आता हे आटवलेले दूध एका दुसऱ्या पातेल्यात काढून घ्या. दूध थोडे थंड झाले म्हणजे रबडी तयार आहे. आता यात सीताफळाचा गर मिसळून चांगल्याने ढवळून घ्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये सुक्या मेव्याचे काप देखील घालू शकता. अशाप्रकारे सीताफळ रबडी तयार आहे. सीताफळ रबडीला फ्रिजमध्ये ठेऊन गार करून घ्या. याने सीताफळाच्या या खास डेजर्टची चव आणखीन छान लागेल.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0