धोकेदायक ऊस वाहतुकीला शिस्त लावा

    18-Nov-2022
Total Views |

overloaded sugarcane truck
(Image Source : Internet)
 
ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून तीन तरुण मुलांचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना दौंड तालुक्यात नुकतीच घडली. काष्टी तालूका श्रीगोंदा येथे राहणाऱ्या या पंचवीशीच्या आतील तीन तरुणांची दुचाकी रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकल्याने हा अपघात घडला अर्थात ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून झालेला हा पहिला अपघात नाही. याआधीही असे अनेक अपघात झाले आहेत व त्या अपघातात काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही ऊस वाहतूकदारांना शिस्त लागत नाही.
 
सध्या राज्यात ऊस वाहतूक जोरात सुरू आहे. अनेक कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान २ ते ३ साखर कारखाने आहेत. त्यामुळे ऊसतोड करून ऊसाची वाहतूक जोमात सुरू आहे. मात्र त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा धोका वाढला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनाचा पाठीमागे किंवा बाजूला कोणत्याही उपाययोजना नसल्याने अपघाताचे प्रकार घडत आहेत. ऊस वाहतूक करताना क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक केली जाते. ट्रॅक्टर चालक दोन ट्रॉली एकमेकांना जोडून ऊस वाहतूक करतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना फक्त ट्रॅक्टर दिसतो. परंतु त्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे असलेल्या ट्रॉलीवर कोणतेच इंडिकेटर नसल्याने फसगत होते. बऱ्याचदा वाहनांच्या एकदम जवळ गेल्यावर त्या ट्रॉली दिसतात आणि मग घाई गडबडीत वाहन चालकांची अपघात राखण्यासाठी धांदल उडते.
 
ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांना रिफ्लेक्टर, रेडियम तसेच टेल लॅम्प नसल्याने रात्री अनेक वाहनचालकांना पुढे ऊस वाहतूक करणारे वाहन आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळेही अपघात होतात. वाहन चालक वाहन थांबवताना रस्त्याच्या मध्येच वाहन थांबवितात त्यामुळे अपघातांना आयतेच निमंत्रण मिळते. अनेक वाहन चालकाकांडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो. काही वाहनांवर तर चक्क अल्पवयीन चालक असतात. ऊस वाहतूक करणारे सर्वच वाहन चालक मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणी लावतात. त्यामुळे लक्ष तर विचलित होतेच, पण ट्रॅक्टरच्या पाठीमागे काय घडते याचा देखील वाहन चालकाला अंदाज येत नाही. मोठ्या आवाजातील गाण्यामुळे इतर वाहनांच्या हॉर्नचा आवाज वाहन चालकांना येत नाही.
 
ऊसाची वाहतूक रात्रभर चालू असते आणि स्पीकर मोठमोठ्याने चालूच असल्याने रस्त्याकडिल गावातील लोकांची झोपमोड होते. अंधारात बैलगाडीने देखील ऊस कारखान्यावर नेला जातो. ऊसाने भरलेली बैलगाडी अंधारात जात असताना समोरून आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांना दिसत नाही त्यामुळेही अपघात होतात. यापुढे तरी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ नये यासाठी आरटीओ प्रशासनाने ऊस वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांसाठी नियमावलीत तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करावेत म्हणजे धोकेदायकपणे सुरू असलेल्या या ऊस वाहतुकीला शिस्त लागेल आणि लोकांच्या जीविताशी चालणारा खेळ थांबेल.
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.