केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सेवापूर्ण प्रशिक्षण घ्यायचे आहे? ही आहे अर्जाची अंतिम मुदत

18 Nov 2022 11:38:09

central public service commission, mumbai
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करण्याची मुदत २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. इच्छुकांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईचे संचालक डॉ. के.एस. जैन यांनी केले आहे.
 
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले अकॅडेमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
 
अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाईन पद्धतीने) घेण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना http://www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. जैन यांनी केले आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 
Powered By Sangraha 9.0