जगदंबा तलवार भारतात आणाच!

    16-Nov-2022
Total Views |

chattrapati shivaji maharaj
 (Image Source : Internet)
 
शिवरायांची ऐतिहासिक जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत भारतात आणली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. २०२४ पर्यंत ही तलवार भारतात येईल त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने पाठपुरवठा केला जाईल, असेही ते म्हणाले. २०२४ साली शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडे तीनशे वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत तरी ही तलवार भारतात यावी, अशी अपेक्षा शिवप्रेमी व्यक्त करीत आहेत.
 
ऐतिहासिक जगदंबा तलवार भारतात यावी हे शिवप्रेमींचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे. शिवरायांच्या विजयाच्या घौडदौडीची साक्षीदार असलेली आणि लढाईत शत्रूला पाणी पाजणारी जगदंबा तलवार महाराष्ट्रात यायलाच हवी, कारण ती महाराजांच्या पराक्रमाची साक्षीदार आहे.
 
१८७५ - १८७६ साली ही तलवार भारतातून इंग्लंडला गेली असल्याचे इतिहासकार सांगतात. १८७५ साली इंग्लंडचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आला होता, तेव्हा तो भारतातील अनेक नामचीन शस्त्रे आपल्यासोबत घेऊन गेला. त्यातच प्रेमाची सक्ती म्हणून जबरदस्तीचे भेट तो करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्याकडून घेऊन गेला. जगदंबा तलवार ही शिवाजी महाराजांचीच आहे, अशी नोंद करवीर शीलालेखागारात आहे. ही तलवार गेल्यापासून ती पुन्हा भारतात यावी यासाठी प्रयत्न झाले, मात्र त्याला यश लाभले नाही. आता महाराजांची ही ऐतिहासिक तलवार परत महाराष्ट्रात येण्याची आशा निर्माण झाली आहे. सरकारने प्रयत्न केल्यास ही तलवार भारतात परत येऊ शकते.
 
मागील वर्षी केंद्र सरकारला अशीच एक दुर्मिळ अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडावरून परत आणण्यात यश आले होते. ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील अठराव्या शतकातील आहे. १९१३ साली ही मूर्ती काशी घाटातून चोरून कॅनडाला पाठवण्यात आली होती. तिथे ही मूर्ती मॅकेन्झि आर्ट गॅलरीत रेजिना विद्यापीठाच्या संग्रहाचा भाग झाली होती. भारतीय नागरिक दिव्या मेहरा यांनी ती मूर्ती त्या गॅलरीत पाहिली आणि ही मूर्ती भारतात परत आणावी, अशी केंद्र सरकारला विनंती केली. केंद्र सरकारनेही ही मूर्ती परत आणण्यासाठी प्रयत्न केले आणि गेल्या वर्षी ही मूर्ती भारतात आली.
 
अमेरिकेने १५ वर्षाच्या तपासानंतर ३०७ पुरातन वस्तू व दुर्मिळ मुर्त्या भारतात परत केल्या आहेत. अर्थात ही सुरवात आहे, कारण भारतातील अशा अनेक पुरातन व दुर्मिळ वस्तू परदेशात आहे. त्यापैकी काहींची चोरीही झाली आहे, मात्र ज्या कलाकृती आणि वस्तू परदेशातील सरकारच्या ताब्यात आहेत त्या तरी परत मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवा. भारताचा मानबिंदू असलेला कोहिनुर हिरा देखील इंग्लंडच्या राणीच्या खजाण्यात आहे. तो देखील भारतात परत आला पाहिजे. आपल्या सुदैवाने ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सूनक हे भारताचे जावई आहेत. केंद्र सरकारने जर जोर लावला तर जगदंबा तलवार, कोहिनुर हिऱ्यासोबतच ब्रिटनच्या खजाण्यात असलेल्या अनेक दुर्मिळ वस्तू भारतात परत येऊ शकतात त्यासाठी हवी ती फक्त सरकारची ईच्छा शक्ती!
 
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.