(Image Source : Internet)
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज डॉ. सलीम अली यांचा आज जन्मदिन आहे. पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर १८९६ रोजी मुंबईत एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सलीम मोईनुद्दीन अब्दुल अली असे होते. सलीम अली हे एक वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे तर दोन वर्षाचे असताना आईचे निधन झाले. अगदी बालवयातच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या सलीम अलींचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला. सलीम अली यांना लहानपणापासून पक्षी निरीक्षणाची आवड होती.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गळ्यावर पिवळा डाग असलेली चिमणी विकत घेतली होती. हा पक्षी कोणता आहे ? त्याचे नाव काय आहे ? हे त्यांना माहीत नव्हते म्हणून ते माहीत करून घेण्यासाठी ते त्या चिमणीला घेऊन मामांकडे गेले. मामांनी सरळ त्याला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या संचालकाकडे घेऊन गेले. तिथे संचालकांनी सलीम अलींना त्या पक्षाची सविस्तर माहिती सांगितली तसेच संस्थेतील भुसा भरलेल्या पक्षांचा संग्रह दाखवला. तो क्षण डॉ सलीम अलींच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या क्षणी त्यांच्यावर पक्षांची जी भुरळ पडली ती कायमचीच. त्यानंतर त्यांना पक्षी निरीक्षणाचा छंदच जडला.
१९१३ साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर डॉ. सलीम अली यांनी सेंट झेव्हीयर महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. लहानपणापासून पक्षी निरीक्षणाची आवड असल्याने सलीम अली यांनी उच्च शिक्षणासाठी प्राणी विज्ञान हा विषय निवडला. या विषयात त्यांना बी. ए. ऑनर्स ही पदवी मिळवली. मात्र ही पदवी विद्यापीठाच्या समकक्ष समजली जात नव्हती. त्यामुळे त्यांना भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्व्हेक्षण संस्थेत नोकरी मिळू शकली नाही मात्र बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत त्यांना व्याख्यता म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर ते जर्मनीची राजधानी बर्लिनला गेले तेथे जाऊन त्यांनी पक्षी शास्त्रावर प्रशिक्षण घेतले. तिथे त्यांना जगप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ एर्व्हिंन ष्ट्रेझमन यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर काही काळ इंग्लंडमध्येही काम केले.
१९३१ साली ते भारतात परत आले. परत आल्यावर त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपकार्यवाहक पद स्वीकारले. नंतर ते या संस्थेचे अध्यक्षही बनले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी हैदराबाद पक्षी निरीक्षण, त्रावणकोर - कोचीन पक्षी सर्व्हेक्षण, अफगाणिस्तान पक्षी सर्व्हेक्षण, कैलास पक्षी निरीक्षण यात्रा अशा मोहिमा राबवल्या. डॉ. सलीम अली यांनी सुगरण पक्षाच्या वर्तनावर बारकाईने अभ्यास केला व त्यावर बिएनएचएस जर्नलमध्ये एक शोधनिबंध लिहिला. या शोध निबंधाने त्यांना पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळवून दिली. डॉ. सलीम अली यांनी भारतभर फिरून विविध पक्षांची तपशीलवार माहिती गोळा केली. ती माहिती त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना समजावी यासाठी पुस्तक रुपात लिहिली. त्यांनी लिहिलेल्या हँडबुक ऑफ इंडिया अँड पाकिस्तान व पिक्टोरियल गाईड या दहा खंडीय पुस्तकाने त्यांचे जगभर नाव झाले. डॉ. डीलन रीलपे यांच्या साथीत त्यांनी अपार मेहनत घेऊन भारतीय पक्षांच्या बाराशे जाती, २१०० उपजातींच्या नोंदी, सवयी, शास्त्रशुद्ध सर्वांगीण माहिती चित्रांसाहित एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली. डॉ. सलीम अली यांच्या ह्याच कार्याने भारतात हौशी पक्षी निरीक्षक बनण्याची परंपरा निर्माण झाली. भारतातील पक्षी निरीक्षक डॉ. सलीम अली यांस आद्य गुरू मानतात. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला तसेच त्यांचा जन्मदिन पक्षीदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. डॉ. सलीम अली यांचे २७ जुलै १९८७ रोजी निधन झाले. डॉ. सलीम अली यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.