अमरावती :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बुध्द धम्म स्वीकारुन रुढी, परंपरांना छेद दिला. एकाच वेळी 7 ते 8 लाख अनुयायांनी बुध्द धम्म स्वीकारला. परंतु ज्यांना या धम्म प्रवर्तक दिनाच्या सोहळ्यात जाता आले नाही, त्यांनी आपापल्या गावागावातच धम्मदीक्षा सोहळे घेऊन बुध्द धम्माचा स्वीकार करणे सुरु केले. मात्र दुसरीकडे ज्या समाजव्यवस्थेने या समाजाला माणूसपण नाकारले होते त्यांनी मग अडवणूक सुरू केली. हल्ले सुरु केले, घरांची जाळपोळ केली. मात्र तरीही आंबेडकरी समाज मागे हटला नाही व आज या धम्मचक्र प्रवर्तनाने आंबेडकरी समाजाला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. एवढेच नव्हे, तर आता बहुजन समाजही ‘चलो बुध्द की ओर’ म्हणत बुध्दाकडे वाटचाल करू लागला, याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्र प्रवर्तनाचे आहे, असे प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्रातील केळापूर येथील श्री. शिवरामजी मोघे महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. राहुल दखने यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने विद्यापीठातील डॉ. के. जी देशमुख सभागृहात ‘धम्मचक्र प्रवर्तनाचे पश्चिम विदर्भावर झालेले परिणाम’ या विषयावर व्याख्यानमाला व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रा. डॉ. राहुल दखने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापाठीच्या केमिकल अँड टेक्नॉलॉजी विभागाचे विभाग प्रमुख अनिल नाईक, प्रमुख अतिथी म्हणून संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद अतिक होते. या प्रसंगी महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष तथा प्रभारी वित्त व लेखा अधिकरी डॉ. नितीन कोळी व विद्यापीठ ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्याथ्र्यांनी आय.ए.एस. परीक्षेत उत्तीर्ण झालेली अमरावतीची पल्लवी चिंचखेडे हिचा समारंंभपूर्वक सत्कार केला. यावेळी व्याख्याता प्रा. डॉ. राहूल दखने यांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले.
व्याख्याता प्रा. डॉ. राहूल दखने पुढे म्हणाले की, धम्मचक्र प्रवर्तनाची तयारी सुरू असतांना याच देशातील असलेला बुध्द धम्म स्वीकारला पाहिजे, अशी अपेक्षा संत गाडगे बाबा यांनीही व्यक्त केली होती ; म्हणूनच संत गाडगे बाबांचे स्वप्नही आज पूर्ण झाले. ते पुढे म्हणाले, जगाच्या इतिहासात डोकावतांना अमेरिकन, रशियन, फ्रेंच अशा राज्यक्रांती झाल्या. भारतातही राजसत्ता, अर्थसत्तेचा प्रमुख शोषणवर्ग होता. या शोषणाविरुद्धचा या सगळ्या राज्यक्रांती झाल्या. आम्हीही माणूस आहो, आम्हालाही जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि धम्मचक्र प्रवर्तनाने तो अधिकार कोणतेही शस्त्र हाती न घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. प्रवर्तन म्हणजे एकातून दुस-या धर्मात जाणे एवढेच मर्यादित नाही, तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक अधिकारही मिळाले.
प्रा. डॉ. दखने पुढे सांगतांना म्हणाले, 1956 पर्यंत विपूल लिखाण झाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर या समाजाच्या पुढा-यांनी हा धम्मक्रांतीचा रथ पुढे नेला. ते म्हणाले की, धम्मचक्र प्रवर्तनानंतर गावागावात धम्मचक्र प्रवर्तन सुरु झाले होते. नागपूरला धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याला जे जावू शकले नाही, त्यांनी आपापल्या गावातच सोहळे घेऊन धम्मदीक्षा घेतली. धम्मचक्र प्रवर्तनाने पारंपारिक कामाचा त्याग केला, गुलामी झुगारली. मात्र त्यानंतर समाजव्यवस्थेकडून विविध त-हेने हल्ले व अत्याचार सुरू झाले. मात्र तरीही समाज मागे हटला नाही.
शहरीकरणाचा जो विस्तार झाला, त्यात गावखेड¬ातील लोकांचा अधिक भरणा झाला. कारण गावागावात जे हल्ले सुरु होते, त्यामुळे लोकं आपले घरदार, गाव सोडून शहराकडे जावू लागले व शहरातही मग आपला एक संघ तयार करण्यात आला. आज स्थिती पार बदलली आहे. आता आंबेडकरी समाज वगळता बहूजन समाजही चलो बुध्द की ओर म्हणत बुध्दाच्या मार्गाने वाटचाल करू लागला आहे. लक्ष्मण माने, सुषमा अंधारे, सुरेश भट, रुप कुळकर्णी अशा कितीतरी लोकांनी बुध्द धम्म स्वीकारला आहे, हा धम्मचक्र प्रवर्तनाचाच परिणाम असल्याचे प्रा. डॉ. राहुल दखने म्हणाले. यावेळी आय.ए.एस. उत्तीर्ण झालेल्या पल्लवी चिंचखेडे यांनी सत्काराला उत्तर देतांना आय.ए.एस. परीक्षेसाठी घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. संतोष बनसोड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका मांडली. संचालन प्रा. डॉ. देवलाल आठवले यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ¬ा प्रमाणावर उपस्थित होते.