(Image Source : Internet)
नागपूर:
आज २ ऑक्टोबर. आजच्या दिवशी भारतात अशा दोन व्यक्तींनी जन्म घेतला की त्यांच्यामुळे देशाला जगामध्ये एक वेगळी ओळख मिळाली. एक राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांना आदराने बापू संबोधले जाते आणि दुसरे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री. महात्मा गांधींजींचा जन्मदिवस संपूर्ण देशात ‘गांधी जयंती’ म्हणून साजरा करतात, तर संपूर्ण जगामध्ये तो ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यामधील बापूंच्या अहिंसक भूमिकेचे योगदान विसरता न येण्यासारखे आहे. तर दुसऱ्या बाजूला देश आज ‘जय जवान,जय किसान’ अशी घोषणा देणारे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचाही जन्मदिवस मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करत आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या शास्त्रींनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की, एखाद्याकडे आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठणे कठीण नसते. आज गांधी यांची १५३ वी तर शास्त्री यांची ११८ वी जयंती साजरी करत असताना देशवासीयांनी त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा विसर पडू देऊ नये.
गांधींच्या विचाराने आणि जीवनशैलीने प्रभावित झालेल्या शास्त्रींनी गांधींच्या असहकार चळवळी दरम्यान देशसेवेचे व्रत स्वीकारले. जातीव्यवस्थेच्या विरोधी असणाऱ्या शास्त्रींनी आपल्या नावापुढे मूळ आडनाव न लिहिता नेहमी त्यांना मिळालेल्या काशी विद्यापिठाच्या ‘शास्त्री’ या पदवीचाच उल्लेख केला. ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ अशा दोन वर्षापेक्षा कमी काळासाठी पंतप्रधानपदी राहिलेल्या शास्त्रींनी त्यावेळच्या भीषण मंदीच्या आणि दुष्काळी स्थितीमध्ये देशवासीयांना आठवड्यातून एकवेळ उपाशी राहण्याचे आवाहन केले होते. पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली देशात हरित क्रांतीस सुरुवात झाली आणि देश यथावकाश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. तथापि, ताश्कंद मध्ये ११ जानेवारी १९६६ रोजी या साध्या, सरळ, प्रामाणिक, निर्मळ आणि स्वाभिमानी नेत्याचा संदिग्धरित्या मृत्यू झाला.
सत्य, अहिंसा, अस्पृश्यता याबद्दल समाजजागृती करून खरी मानवता कशी असते याबाबत स्वतःच्याच जीवनाचा आदर्श आपणापुढे ठेवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही टिकून असून त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांनी जगभरातील अनेक नेते भारावून गेले तर अनेक जण त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुकरण करून संघर्षात यशस्वी झाले. गांधीजी नेहमी म्हणत, शरीर आणि मन अस्वच्छ असेल, तर परमेश्वर कधीच प्राप्त होऊ शकणार नाही तथापि, माणसांनी तना-मनाने स्वच्छ राहण्यासाठी त्यांची गावे, शहरे आणि परिसरही स्वच्छ ठेवावयास हवा. पृथ्वी, हवा, भूमी आणि पाणी हे सर्व आपणास वारसा हक्काने मिळाले नसून ती पुढील पिढ्यांसाठीची जोखीम असून ती किमान जशीच्या तशी त्यांच्या हाती सोपवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
आज समाजात व्यसनाधीनता, गुन्हेगारी, अतिरेकी कारवाया यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक ऐक्यास बाधा आणणारी कृत्ये घडत आहेत. श्रमाला कमी महत्व दिले जात असले तरी श्रमदानामुळेच मनुष्य स्वावलंबी बनतो. व्यसनाधीनतेमुळे सर्व क्षेत्रात हानी होत असून वाहनांचे अपघात, महिलांचे बळी, आत्महत्या, निष्पाप व निरागस मुलांच्या हत्या, घडत आहेत. तेव्हा गांधी-शास्त्री जयंतीच्या निमित्ताने सत्य, अहिंसा, साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि निरोगी आरोग्यमान या पंचसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने विशेषतः युवा पिढीने करावा आणि समाजसुधारणे बरोबरच व्यसनाधीनता नाहीशी करून ‘विज्ञाननिष्ठ’ भारत घडवू या !!
आपला विश्वासू ,
प्रा. विजय कोष्टी, सहयोगी प्राध्यापक.
पी.व्ही.पी. कॉलेज, कवठेमहांकाळ जि. सांगली.
९४२३८२९११७.
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.