उत्सव साजरे करा, पण ध्वनिप्रदूषण नको;डीजेच्या दणदणाटावर उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

    08-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर डीजे व मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांच्या वापराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी मोठ्या आवाजातील डीजे आणि ध्वनिक्षेपकांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. यावरून आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डीजेच्या वाढत्या आवाजावर भाष्य करत ‘सण-उत्सव साजरे करण्यास कोणाचाही विरोध नाही; मात्र त्यासाठी गोंगाट कशाला?’ असा सवाल केला. सणांचे धार्मिक आणि सांस्कृतिक पावित्र्य जपले गेले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डीजेच्या वापराबाबत सरकारने गणेशोत्सव मंडळांशी संवाद साधून मार्ग काढावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. तसेच विद्यानंद बापट आणि संतोष पंडित यांच्या मागण्यांवर सरकारने चर्चा का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या मागण्या समजून घेऊन चर्चा करण्याची गरज आहे, असे म्हणत ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. रात्रीच्या वेळी आंदोलकांना ताब्यात घेण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी म्हटले.

धनुष्यबाण चिन्हाबाबतही ठाकरे आक्रमक-
दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून शिंदे गटाकडून सध्या बाजू मांडली जात आहे.

या प्रकरणाचा निकाल लागण्यास आणखी विलंब होत असेल, तर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. पक्षचिन्हाच्या वादावर लवकर निर्णय होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.