अमरावती-वर्धा सीमेवर चार बळी घेणारी वाघीण जेरबंद;२० दिवसांच्या दहशतीला पूर्णविराम!

    08-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

अमरावती : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गेल्या २० दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अखेर वनविभागाने पकडले. चांदूर बाजार तालुक्यातील शिरजागाव परिसरात सोमवारी विशेष पथकाने वाघिणीला बेशुद्ध करून ताब्यात घेतले.

१७ ऑगस्टपासून वाघिणीच्या हल्ल्यांची मालिका सुरू होती. आष्टी तालुक्यातून तिचा वावर सुरू झाल्यानंतर ती वरुड, मोर्शी आणि चांदूर बाजार परिसरात फिरत होती. या काळात तिच्याकडून नागरिक तसेच पाळीव जनावरांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात दहशत पसरली होती.

६ सप्टेंबर रोजी अवघ्या एका दिवसात दोन जणांचा बळी गेल्यानंतर वनविभागाने शोधमोहीम अधिक तीव्र केली. वाघिणीचा माग काढण्यासाठी विविध ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले. तसेच थर्मल ड्रोनच्या माध्यमातून तिच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली.

रात्रंदिवस सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान अखेर शिरजागाव परिसरात वाघिणीचे ठिकाण निश्चित झाले. त्यानंतर विशेष पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत तिला बेशुद्ध केले आणि सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

वाघिणीला पकडण्यात वनविभागाला यश आल्याने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून, तब्बल २० दिवसांपासून सुरू असलेली दहशत अखेर संपली आहे.