स्वच्छ वायू सर्वेक्षणात नागपूरची चमकदार कामगिरी; देशात १०वा, महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

    08-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण-२०२६’ मध्ये नागपूरने दमदार कामगिरी नोंदवत देशातील मोठ्या शहरांमध्ये दहावे स्थान मिळवले आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात नागपूरला १८३.८ गुण मिळाले असून, महाराष्ट्रातील शहरांमध्ये नागपूर तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.

शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांना या कामगिरीमुळे मोठे यश मिळाले आहे. स्वच्छ हवा कृती आराखड्याची अंमलबजावणी, पर्यावरणपूरक ई-बसेसचा वापर, मोठ्या प्रमाणातील वृक्षारोपण तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा या कामगिरीत हातभार लागला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापौर निता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी नागपूरकरांचे अभिनंदन केले. उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे आणि सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनीही या यशाचे स्वागत केले.

महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचा विकास वेगाने सुरू आहे. नागरिकांना निरोगी वातावरण आणि स्वच्छ हवा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षणातील कामगिरीमुळे या प्रयत्नांना आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी या यशाचे श्रेय महापालिका प्रशासनासह नागपूरकरांच्या सहभागाला दिले. स्वच्छ हवा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभाग सातत्याने काम करत असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात प्रदूषण नियंत्रणासाठी आणखी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून ई-बसेसचा वापर वाढविण्यासोबतच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्याचा आगामी काळात हवेच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

स्वच्छ हवा, हरित नागपूर आणि प्रदूषणमुक्त शहराच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना देशातील दहाव्या क्रमांकाच्या कामगिरीमुळे नवी चालना मिळाली आहे.