मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक; ७ किलो वजन घटलं, मंत्र्यांच्या फोननंतर उपचारास होकार

    08-Sep-2026
Total Views |
उपोषण मात्र सुरूच ठेवण्याचा निर्धार

Image Source:(Internet)

जालना :
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत मोठी खालावण झाली आहे. गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांचे वजन तब्बल ७ किलोने घटले असून रक्तातील साखरेची पातळीही कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेदरम्यान जरांगे पाटील यांना उलट्या झाल्या. त्यानंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने जालना येथील नागरी रुग्णालयाच्या शल्यचिकित्सकांनी त्यांची तपासणी केली. तपासणीत रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे तसेच वजन सात किलोने घटल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी सोमवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजता त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. प्रकृती लक्षात घेता उपचार घेण्याची आणि सलाईन लावून घेण्याची विनंती त्यांनी केली. मंत्र्यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी उपचार घेण्यास होकार दिला. त्यांना चार सलाईन लावण्यात आल्याची माहिती आहे.

उपोषण सोडण्यास मात्र स्पष्ट नकार-
प्रकृती खालावत असतानाही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारच्या विनंतीनंतर त्यांनी पाणी घेतले होते. मात्र उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी स्पष्टपणे फेटाळली होती.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी सरकारला १२ सप्टेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या दिवशी मराठा समाजाने मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत जमावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. त्यानंतर मुंबईकडे जाण्याची पुढील दिशा आणि तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास कायदा-सुव्यवस्था आणि पोलिस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.