
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : क्रिकेटविश्वात २२ सप्टेंबर २०२६ हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. भारत आणि जपानचे क्रिकेट संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत. जपान क्रिकेट असोसिएशनने या ऐतिहासिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून केंडल फ्लेमिंग जपानचे नेतृत्व करणार आहे.
भारत आणि जपान यांच्यातील हा सामना २२ सप्टेंबर २०२६ रोजी जपानमधील तोचिगी प्रांतातील सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना सुझुकी चषकाचा भाग असून भारत-जपान राजनैतिक संबंधांच्या ७५ वर्षांच्या सोहळ्याच्या प्रारंभानिमित्त त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
‘स्पोर्ट ७५’ उपक्रमातून क्रिकेटला नवे व्यासपीठ-
भारत आणि जपानमधील क्रीडा संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच खेळाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील नागरिकांमधील संपर्क आणि सहकार्य वाढवण्यासाठी हा सामना आयोजित करण्यात आला आहे. ‘स्पोर्ट ७५’ या उपक्रमांतर्गत जपानमध्ये क्रिकेटचा प्रसार आणि स्थानिक पातळीवर या खेळाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
जपानसाठी हा सामना केवळ एक क्रिकेट सामना नसून देशातील क्रिकेटच्या विकासासाठी मोठी संधी मानली जात आहे. विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाला जपानमध्ये खेळताना पाहण्याची संधी स्थानिक क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.
जपान क्रिकेट असोसिएशनकडून उत्साह व्यक्त-
या सामन्याची घोषणा झाल्यानंतर जपान क्रिकेट असोसिएशनचे सीईओ नाओकी मियाजी यांनी भारताविरुद्धचा सामना जपानी क्रिकेटसाठी ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटले होते. विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाला जपानमध्ये खेळण्यासाठी आमंत्रित करणे हा जपान क्रिकेट असोसिएशनसाठी अत्यंत विशेष प्रसंग असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, भारतीय क्रिकेट चाहत्यांचे जपानमध्ये स्वागत करताना त्यांनी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित राहून जपानच्या संघाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
भारत आणि जपान यांच्यातील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असल्याने या ऐतिहासिक लढतीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. एका बाजूला जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य भारतीय संघ, तर दुसऱ्या बाजूला जपानचा उत्साही संघ या सामन्यामुळे जपानमध्ये क्रिकेटला निश्चितच नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.