
Image Source:(Internet)
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनेता अभिनय बेर्डे याने मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, आता अभिनयने आपल्या कारकिर्दीत काही काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याने यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.
अभिनयने सांगितलं की, स्वतःचं नव्या स्वरूपाचं उद्योगविश्व सुरू करण्यासाठी तो अभिनय क्षेत्रातून काही काळ दूर राहणार आहे. या नव्या उपक्रमासाठी त्याला वेगळ्या आणि कल्पक कल्पनांची गरज असून, त्यासाठी त्याने थेट चाहत्यांची मदत मागितली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनय म्हणतो, “मी माझ्या कारकिर्दीतून थोडा ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे. हा ब्रेक मी स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी घेत आहे. त्यासाठी मला काही नवीन कल्पना हव्या आहेत.”
अजून या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचंही अभिनयने सांगितलं. त्याच्याकडे अद्याप निश्चित कल्पना नसल्याने चाहत्यांनी त्यांच्या भन्नाट, वेगळ्या आणि कल्पक कल्पना प्रतिक्रियांमधून शेअर कराव्यात, असं आवाहन त्याने केलं आहे. तसेच काही कल्पना आवडल्यास संबंधित व्यक्तींशी थेट संपर्क साधण्याचे संकेतही त्याने दिले.
“कारकिर्दीतून ब्रेक घेतोय... पुढच्या प्रवासासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे,” असं म्हणत अभिनयने चाहत्यांना या नव्या प्रवासात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्याच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत विविध कल्पनाही सुचवल्या आहेत.
दरम्यान, अभिनयने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘रंपाट’, ‘बॉईज ४’, ‘दशावतार’ आणि ‘उत्तर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. आता अभिनयच्या नव्या उद्योगाची कल्पना नेमकी काय असणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.