जिद्दीला सलाम...लेकींच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी झेप; ४७ वर्षीय रमाबाईंनी मॅरेथॉन जिंकली!

    08-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बीड : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलांच्या भविष्यासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील रमाबाई रणवीर यांनी दिला आहे. वयाच्या ४७व्या वर्षी आपल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनवाणी धावत मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या जिद्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अंबाजोगाई येथे राहणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्यावर पतीच्या निधनानंतर दोन मुलींच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी आली. मुंबईत झालेल्या एका दुर्घटनेत त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू नये, असा निर्धार केला.

मुलींना शिक्षण देण्यासाठी रमाबाईंनी एका अकॅडमीत स्वयंपाकाचे काम स्वीकारले. दिवसभर किचनमध्ये काम करत असतानाच त्या आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीला अकॅडमीत प्रवेश मिळवून देण्यात आला असून, दोन्ही मुली आपल्या भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.

३ हजारांच्या बक्षिसासाठी मॅरेथॉनमध्ये सहभाग-
स्थानिक संस्थेच्या वतीने ‘अमृत दौड’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यास ३ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मुलींच्या पुस्तकांसाठी पैसे मिळावेत या उद्देशाने रमाबाईंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, आधुनिक ट्रॅकसूट घातलेल्या तरुण स्पर्धकांसोबत रमाबाई चक्क साडी नेसून धावण्यासाठी मैदानात उतरल्या. सुरुवातीला पायातील चप्पल सांभाळत धावताना त्यांना अडचणी आल्या. अखेर त्यांनी चप्पल हातात घेतली आणि अनवाणी धावण्यास सुरुवात केली.

रस्त्यातील दगड पायांना टोचत होते, साडी सांभाळत धावावे लागत होते; मात्र मुलींच्या भविष्यासमोर या वेदना त्यांना क्षुल्लक वाटल्या. त्यांनी धावण्याचा वेग कायम ठेवत एकामागून एक स्पर्धकांना मागे टाकले आणि अखेर मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळवले. त्यांची जिद्द पाहून उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा उत्साह वाढवला.

धावताना डोळ्यासमोर मुलींचे भविष्य होते-
विजयानंतर रमाबाईंनी सांगितले की, स्पर्धेत अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. मात्र, बक्षीस जिंकण्याचा त्यांनी मनाशी पक्का निर्धार केला होता. धावत असताना त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या मुलींचे भविष्य होते. मिळालेल्या ३ हजार रुपयांतून मुलींसाठी पुस्तके खरेदी करण्याचा त्यांचा मानस होता.

रमाबाईंची मुलगी पूजा हिनेही या स्पर्धेत सहभाग घेतला आणि तिने दुसरा क्रमांक मिळवला. आईला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहित केले होते; मात्र त्या थेट पहिल्या क्रमांकावर येतील, याची कल्पनाही नव्हती, असे पूजाने सांगितले.

मुलींच्या स्वप्नांसाठी आईची अहोरात्र धडपड-

पूजा सध्या पोलिस भरतीची तयारी करत असून पोलिस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. तिची बहीण बँकिंग परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्वी शेतीवर अवलंबून होता. मात्र मुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रमाबाईंनी अकॅडमीत स्वयंपाकाचे काम सुरू केले.

पूजाची मेहनत आणि परिस्थिती लक्षात घेऊन अकॅडमीच्या संचालकांनी तिची फी माफ केली होती. अशा परिस्थितीत रमाबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेली धडपड अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

रमाबाईंचा मॅरेथॉनमधील विजय हा केवळ एका स्पर्धेतील यश नाही, तर आईच्या जिद्दीचा आणि मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाचा विजय आहे. दिवसभर कष्ट करूनही त्यांनी हार न मानता अनवाणी धाव घेतली आणि जिंकलेली रक्कमही मुलींच्या पुस्तकांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या जिद्दीला सध्या सर्वत्र सलाम केला जात आहे.