
Image Source:(Internet)
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आपल्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा संदर्भ देत, सुशिक्षित आणि उच्चभ्रू परिसराच्या तुलनेत गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड आणि रेड-लाइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातून आपल्याला अधिक मतदान मिळाल्याचा दावा केला.
गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, उच्चभ्रू आणि सुशिक्षित भागांमध्ये त्यांना सुमारे ७० ते ७५ टक्के मतदान झाले. मात्र, गुन्हेगारी आणि रेड-लाइट परिसरात त्यांच्या बाजूने तब्बल ९२ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले.
“याचा चुकीचा अर्थ काढू नका”
आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये, यासाठी गडकरी यांनी स्पष्टीकरणही दिले. संबंधित परिसरातील व्यक्तींशी आपले कोणतेही वैयक्तिक संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही बेकायदेशीर कारवायांना आपला पाठिंबा नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या भागांमध्ये रस्ते, मूलभूत सुविधा आणि समाजोपयोगी विकासकामे करण्यात आली. या कामांमुळे नागरिकांचा आपल्यावरील विश्वास वाढला आणि त्याचे प्रतिबिंब मतदानात उमटले, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
गडकरींचे वक्तव्य पुन्हा चर्चेत
नितीन गडकरी आपल्या स्पष्ट आणि थेट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या भाषणातील प्रत्येक वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. यापूर्वी सार्वजनिक जीवनातील तीन दशकांच्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी नव्या पिढीला संधी देण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत चर्चा रंगली होती.
मात्र, त्यांच्या कार्यालयाकडून नंतर स्पष्टीकरण देत हे वक्तव्य राजकारणातून निवृत्तीबाबत नसून लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या संदर्भात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
आता गुन्हेगारी आणि रेड-लाइट परिसरातून उच्चभ्रू भागांपेक्षा अधिक मतदान मिळाल्याच्या दाव्यामुळे गडकरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.