
Image Source:(Internet)
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली असून, मराठा, कुणबी आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयांमुळे शैक्षणिक सवलती, वसतिगृह निर्वाह भत्ता, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबत लवकरच शासन आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
चार महत्त्वाचे निर्णय-
मराठा विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय प्रवर्गाप्रमाणे विविध शैक्षणिक सोयी-सुविधा आणि सवलतींचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाकडून विद्यापीठांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटींचा निधी-
आर्थिकदृष्ट्या मागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रलंबित भत्त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सारथीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीमध्ये मोठा बदल-
सारथीमार्फत परदेशातील विद्यापीठांची शिक्षण फी आता थेट संबंधित शिक्षण संस्थेला अदा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या लाभासाठी असलेली कमाल मर्यादा रद्द होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना दरवर्षी १,५०० अमेरिकन डॉलर, तर ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १,१०० पौंड अतिरिक्त निर्वाह भत्ता मिळणार आहे.
१,४४० तरुणांना मोफत वाहनचालक व वाहक प्रशिक्षण-
सारथी संस्थेने पिंपरी-चिंचवड येथील वाहनचालक प्रशिक्षण केंद्रासोबत करार केला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२६ पासून १,४४० मराठा आणि कुणबी तरुणांना हलकी व अवजड वाहनचालक तसेच वाहकाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणातून किमान १,००० लाभार्थ्यांना रोजगार मिळवून देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली-
दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. शनिवारपासून त्यांनी पाणी आणि सलाइन घेणेही बंद केल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ राज्यातील विविध भागांत मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.
धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे रविवारी आंदोलकांनी दोन वेळा रास्ता रोको केला. सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत जरांगे यांच्या सर्व मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगितल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
राज्य सरकारच्या या चार निर्णयांमुळे मराठा, कुणबी आणि एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढील दिशा आणि सरकारकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.