
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) दक्षिण कॅम्पसजवळील सत्य निकेतन परिसरात ३० वर्षे जुनी पाच मजली इमारत रविवारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे. घटनेनंतर इमारत कोसळतानाचे अनेक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत दिल्ली सरकारने मोठी कारवाई केली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) उपायुक्त, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, सहायक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता अशा पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. इमारतीच्या देखभाल, बांधकाम आणि सुरक्षेशी संबंधित जबाबदाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.
या दुर्घटनेनंतर इमारतीचा मालक हरिराम बन्सल यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तब्बल १० विशेष पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये स्थानिक जिल्हा पोलिसांसह विशेष पथके आणि इतर ऑपरेशनल युनिट्सच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
प्रत्येक पथकाचे नेतृत्व अतिरिक्त डीसीपी दर्जाचा अधिकारी करत आहे. हरिराम बन्सल यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही छापेमारी केली जात आहे.
दरम्यान, सत्य निकेतन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए), एमसीडी आणि दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. इमारत दुर्घटनेची कारणे, जबाबदारी निश्चित करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सत्य निकेतनसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरातील जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दाही या दुर्घटनेनंतर ऐरणीवर आला आहे.