धार्मिक कार्यक्रमांत डीजे टाळण्याचे आवाहन; फतव्याचे प्यारे खानांकडून स्वागत

    07-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून इतरांना त्रास देणे इस्लाममध्ये मान्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या फतव्याचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी स्वागत केले आहे.

मुज्तबा शरीफ खान अशहरी मिस्बाही, मुहतमिम अल-जामेअतुर रज़विया दारुल उलूम अमजदिया यांच्या वतीने हा फतवा जारी करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला त्रास देणे किंवा त्याच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी कृती करणे इस्लाममध्ये मान्य नसल्याचे फतव्यात नमूद करण्यात आले आहे.

ईद, दर्ग्यांवरील धार्मिक कार्यक्रम, संदल तसेच अन्य धार्मिक सोहळ्यांमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक उत्सव साजरे करताना इतर नागरिकांची शांतता आणि आरोग्य यांचाही विचार केला पाहिजे, अशी भूमिका या फतव्यात मांडण्यात आली आहे.

या भूमिकेचे स्वागत करताना प्यारे खान यांनी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे स्पष्ट केले. धार्मिक श्रद्धा आणि उत्सवांचा सन्मान राखतानाच इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या धार्मिक कार्यक्रमात नियमांचे पालन करून शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.