गणेशभक्तांच्या गावी जाण्यासाठी २९०० एसटी बसगाड्या; एकनाथ शिंदेंची माहिती

    07-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना आपल्या गावी सहजपणे जाता यावे, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोठा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गणेशभक्तांच्या प्रवासासाठी २९०० एसटी बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून, मोफत बससेवेची सुविधा दिली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मोफत बससेवेच्या तिकीट वितरण कार्यक्रमात शिंदे बोलत होते. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जपणारा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक मुंबईसह विविध शहरांमधून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या मूळ गावी जातात. रेल्वे तसेच इतर वाहतुकीच्या साधनांवर मोठी गर्दी होत असल्याने अनेकांना प्रवासाची तिकिटे मिळत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन मोफत एसटी बससेवेचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारातून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भविष्यातही गणेशोत्सवाच्या काळात ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्धार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आपल्या कार्यकाळातील समाधान देणाऱ्या योजनांपैकी एक असल्याचे सांगत, या योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांशी ‘लाडका भाऊ’ म्हणून आपले नाते निर्माण झाल्याचे शिंदे म्हणाले.