अभिजित दीपकेंच्या शाळा पाहणी मोहिमेला पोलिसांचा इशारा; परवानगीशिवाय प्रवेश केल्यास गुन्हा दाखल

    05-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : शासकीय शाळांमधील सुविधांचा आढावा घेण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) मोहिमेला आता मुंबई पोलिसांनी नियमांची आठवण करून दिली आहे. शाळा व्यवस्थापनाची परवानगी न घेता शाळेच्या आवारात प्रवेश करून आंदोलन किंवा पाहणी केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिला आहे.

सीजेपीकडून सध्या देशभरातील शासकीय शाळांना भेटी देऊन तेथील मूलभूत सुविधांची पाहणी केली जात आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, तसेच शाळांमधील स्वच्छतागृहे, वर्गखोल्या आणि इतर सुविधांची स्थिती तपासणे, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपल्या मूळ गावातील शाळेला भेट देऊन या उपक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर इतरही काही शाळांना भेटी देण्यात आल्या. या पाहणीदरम्यान काही शाळांमध्ये स्वच्छतागृहांची दुरवस्था, तर काही ठिकाणी वर्गखोल्यांची खराब अवस्था असल्याचे समोर आल्याचा सीजेपीचा दावा आहे.

मात्र, शाळांमध्ये प्रवेश करण्याच्या पद्धतीवर मुंबई पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. शाळा आणि महाविद्यालये ही विद्यार्थी व शिक्षकांची ठिकाणे आहेत. व्यवस्थापनाची परवानगी नसेल तर सीजेपीच्या नावाखाली तेथे आंदोलन किंवा इतर उपक्रम राबवू नयेत, असे देवेन भारती यांनी स्पष्ट केले.

एखाद्या शाळेने विनापरवानगी प्रवेशाबाबत तक्रार केल्यास पोलिसांकडून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सीजेपीच्या मोहिमेमुळे शासकीय शाळांमधील पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र आता मुंबई पोलिसांच्या इशाऱ्यानंतर अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील सीजेपी पुढे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.