
Image Source:(Internet)
भुसावळ : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भुसावळमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी नगराध्यक्षांसह तब्बल ११ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भुसावळ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
२०२५ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत नगराध्यक्षपद मिळवले होते. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवल्यानंतर त्यांना नगराध्यक्षपद गमवावे लागले.
दरम्यान, भुसावळ नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील गटनेते सचिन संतोष चौधरी, इक्बाल दिलनवाज शेख, उल्हास भीमराव पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन भास्कर पाटील, अकील नादर पिंजारी, शबाना बी. सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
याशिवाय सिकंदर खान, नदीम सरकार, इसाक बागबान, ओमप्रकाश झा, गिरीश पारधी, महेंद्र चौधरी, नरसिंह तायडे, अनिकेत झा, नचिकेत मंदवाळे, आरिफ खान, आरिफ शेख यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या सर्वांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. भुसावळमध्ये झालेल्या या मोठ्या पक्षांतरामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.