अंतरवाली सराटीत हायहोल्टेज घडामोडी; सरकारच्या शिष्टमंडळाची मनधरणी, मात्र मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

Image Source:(Internet)
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याचे सांगत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, ‘१० सप्टेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करा; अन्यथा १२ सप्टेंबरला गुलाल घेऊन मुंबईत येऊ,’ असा थेट इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मकरंद पाटील आणि प्रसाद लाड यांनी आज अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची माहिती देत जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली.
मला शेवटचं आंदोलन करायचं आहे-
सरकारकडून १० सप्टेंबरपर्यंत शासन निर्णय काढण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, जरांगे यांनी यावर समाधान व्यक्त न करता ‘१० सप्टेंबरपर्यंत जीआर काढण्यात अडचण काय आहे?’ असा सवाल उपस्थित केला. ‘११ सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य करा. त्यानंतर १२ सप्टेंबरला गुलाल घेऊन मुंबईला जाऊ,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘मला हे शेवटचं आंदोलन करायचं आहे,’ असे सांगत जरांगे यांनी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
सरकारकडून उपोषण सोडण्याची विनंती-
उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत, अशी विनंती प्रसाद लाड आणि उदय सामंत यांनी केली.
उदय सामंत यांनी सांगितले की, जरांगे यांनी केलेल्या मागण्यांवर सरकारने आतापर्यंत सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यांची प्रकृती महत्त्वाची असून त्यांनी उपचार घेऊन बरे व्हावे आणि त्यानंतर सरकारकडून उर्वरित कामे करून घ्यावीत. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावे, अशी सरकारची भूमिका आहे.
‘५८ लाख नोंदी शोधल्या, साडेतीन लाख दाखले दिले’
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा मांडला. न्यायमूर्ती शिंदे समितीने आतापर्यंत ५८ लाख नोंदी शोधून काढल्याचा दावा त्यांनी केला. तसेच एसईबीसीअंतर्गत सुमारे साडेतीन लाख मराठा तरुणांनी दाखले घेतले असून २०२३ नंतर लाखो विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जात प्रमाणपत्रासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या असून प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. शिरीष यादव यांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे प्रलंबित काम आणि थकीत देणी मार्गी लावली जातील, असे सरकारकडून सांगण्यात आले.
विखे पाटील बोलत असतानाच घोषणाबाजी-
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील सरकारची भूमिका मांडत असताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काही काळ त्यांना आपले बोलणे थांबवावे लागले.
यावेळी विखे पाटील यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘मी तुमच्यातलाच आहे, तुमचा भाऊ आहे. जरांगे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आमचे सरकार मराठा समाजाच्या हितासाठी काम करत आहे,’ असे त्यांनी सांगितले.
‘निर्णय झाला तर गुलाल घेऊन मुंबईला जाऊ’-
यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलकांची समजूत काढत सरकारला पुन्हा मुदत दिली. ‘१० सप्टेंबरच्या आत निर्णयाची अंमलबजावणी झाली तर आपण सर्वजण गुलाल घेऊन १२ सप्टेंबरला मुंबईला जाऊ,’ असे त्यांनी सांगितले.
तसेच १२ सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगत मोठ्या संख्येने तरुण मुंबईत येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
‘३५ ते ४० लाख तरुण येणार आहेत. आज सरकारकडून आणलेली कागदपत्रे घेऊन आले आहेत, पण त्यावर माझा विश्वास नाही. आता मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुलाल टाकू,’ असे म्हणत जरांगे यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली.
त्यामुळे सरकारकडून उपोषण सोडण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि जरांगे यांचा आंदोलनावर कायम असलेला निर्धार यामुळे अंतरवाली सराटीत दिवसभर राजकीय आणि आंदोलनात्मक घडामोडींना वेग आला.