
Image Source:(Internet)
ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील मानपाडा परिसरातील गणेशनगर येथे घडली. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात हा हल्ला करण्यात आला. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे.
प्रदीप पुर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील एक गोळी छातीवर, तर दुसरी मांडीला लागली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना इन्फिनिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, हत्येचा CCTV फुटेज समोर आले असून दोन आरोपी चेहऱ्यावर रुमाल बांधून दुचाकीवरून घटनास्थळी आल्याचे दिसत आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे आणि संतोष कलुसिया या संशयितांची नावे समोर आली असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची नऊ पथके इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
या हत्येमागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी शिवसेना नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. गणपतीपासून संशयितांकडून रेकी सुरू असल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत मनोरमा नगर परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मधून पुर्णेकर यांच्या पत्नी विजेता पुर्णेकर आणि भाऊ जयनाथ पुर्णेकर यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.