
Image Source:(Internet)
नागपूर : ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन, नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी सुरक्षेचा व्यापक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. लाखोंच्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन पोलीस, महापालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पोलीस विभागासह महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, NIT, महावितरण आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून २० ऑक्टोबरला ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी साजरी होणार आहे. या काळात दीक्षाभूमी, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि भिलगावातील नागलोक येथे मोठ्या संख्येने भाविक व अनुयायी दाखल होण्याची शक्यता आहे.
संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांसह धार्मिक स्थळे, मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रण, पार्किंग, CCTV निगराणी, पाणी, स्वच्छता, वीजपुरवठा आणि वैद्यकीय सुविधांचे नियोजनही करण्यात येणार आहे.
गरबा, दांडिया, देवी विसर्जन मिरवणुका आणि सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणीही विशेष सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सव शांततेत साजरा करावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.