
Image Source:(Internet)
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांना दहशतवादविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. मध्य काश्मीरमधील युसमार्ग परिसरात झालेल्या चकमकीत पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर सुलेमान शाह उर्फ ‘फौजी मुसा’ ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्ससह सुरक्षा दलांनी कोरग परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरू केली होती. या कारवाईदरम्यान जवानांनी संशयितांना घेरल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर चकमक सुरू झाली. यात मुसा मारला गेला.
सुलेमान शाह हा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असलेला लश्करचा वरिष्ठ कमांडर होता. पीर पंजाल पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंना झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी याच महिन्याच्या सुरुवातीला युसमार्गच्या डोंगराळ भागात झालेल्या चकमकीत तो सुरक्षा दलांना चकवा देऊन पसार झाला होता.
दरम्यान, चकमकीनंतर सुरक्षा दलांनी दूधपत्री आणि लगतच्या जंगल परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता लक्षात घेऊन जवानांनी मोठ्या भागाला घेराव घातला असून, संशयास्पद हालचालींचा शोध घेतला जात आहे.