७० लाखांचे नुकसान

Image Source:(Internet)
नागपूर : बडा ताजबाग परिसरात मध्यरात्री मंडप डेकोरेशनच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
हाजी मोहम्मद वकील यांच्या मंडप डेकोरेशनच्या दुकानात रात्री १२.११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. काही क्षणांतच आगीने मोठा भडका घेतल्याने दुकानातील सजावटीचे साहित्य आगीच्या तडाख्यात सापडले.
घटनेची माहिती मिळताच सक्करदरा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आग विझेपर्यंत दुकानातील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून गेले होते.
अग्निशमन विभागाच्या प्राथमिक पाहणीत नुकसानाचा आकडा सुमारे ७० लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आगीचे निश्चित कारण आणि नुकसानीचा अंतिम आकडा तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.