भारताच्या लेकींची सुवर्ण कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन गोल्ड मेडलची भर

    30-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ११व्या दिवशी भारतीय महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी करत देशाला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. महिला ४×४०० मीटर रिलेमध्ये किरण पहल, पूवम्मा एम.आर., प्राची आणि विथ्या रामराज यांच्या संघाने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचबरोबर महिला ट्रॅपच्या वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिनेही सुवर्ण कामगिरी केली.

या दोन सुवर्णपदकांमुळे स्पर्धेतील भारताच्या गोल्ड मेडलची संख्या ६ वर पोहोचली आहे. रिले संघाच्या शानदार विजयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करत चारही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. भारतीय खेळाडूंचा वेग, मेहनत आणि जिद्द यामुळे देशाला सर्वोच्च स्थान मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

चारही धावपटूंमधील उत्तम समन्वय आणि सांघिक कामगिरीचेही मोदी यांनी विशेष कौतुक केले. भारतीय अॅथलेटिक्ससाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ट्रॅप शूटिंगमध्ये नीरू धांडाने अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या कामगिरीसह भारतीय महिला खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील देशाच्या पदकसंख्येत महत्त्वाची भर घातली.