प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेर प्रतिकात्मक ‘चेकअप’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यांवर भाजयुमोचा उपरोधिक निशाणा

Image Source:(Internet)
नागपूर : राहुल गांधी यांच्या राजकीय वक्तव्यांचा निषेध नोंदवण्यासाठी नागपुरात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात आणून त्याची ‘मानसिक तपासणी’ करण्यात आली.
भाजयुमोचे प्रशांत भोयर यांनी डॉक्टरची भूमिका साकारत पुतळ्याचे ‘चेकअप’ केले. यानंतर राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला ‘मानसिक उपचारांची गरज’ असल्याचा उपरोधिक दावा करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
राहुल गांधी विविध मुद्द्यांवरून भाजपवर सातत्याने टीका करत असल्याचा आरोप यावेळी भाजयुमो कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या वक्तव्यांवर उपरोधिक भाष्य करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष दया शंकर तिवारी, भाजयुमो अध्यक्ष सचिन करावे आणि प्रशांत भोयर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रतीकात्मक पुतळा, डॉक्टरचा वेश आणि ‘तपासणी’चा देखावा यामुळे या आंदोलनाची शहरात चर्चा रंगली.